वाशीममध्ये शौचालय उभारणीला मिळतेय गती !
By Admin | Published: September 1, 2016 09:24 PM2016-09-01T21:24:56+5:302016-09-01T21:24:56+5:30
स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कुटुंबस्तर संवाद अभियानांतर्गत गृहभेटी देण्याचा उपक्रम जोरासोरात राबविला
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 1 - जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कुटुंबस्तर संवाद अभियानांतर्गत गृहभेटी देण्याचा उपक्रम जोरासोरात राबविला जात आहे. या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला जात असल्याने जिल्ह्यात शौचालय उभारणी कामास वेग मिळाल्याचे दिसून येत आहे. नव्याने उभारल्या जाणाऱ्या शौचालयाचे उद्घाटन स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष करीत असल्याने ही मोहीम यशस्वी वळणावर येऊन ठेपली आहे.
शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरावर खतरा नमूद करून लाल स्टिकर लावले जात आहेत. दरम्यान, मंगरूळपीर तालुक्यातील बोरव्हा या गावात बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा चौधरी यांच्यासह जिल्हा परिषदेतील स्वच्छता कक्षाच्या चमुने भेट देवून तेथील ग्रामस्थांचे उद्बोधन केले.
यावेळी मंगरूळपीर पंचायत समिती सभापती निलीमा देशमुख, उपसभापती सागर बोडखे, जि.प. सदस्य राजू जाधव, पं.स. सदस्य युनूस खाँ, गटविकास अधिकारी राठोड, विस्तार अधिकारी पद्मणे, सरपंच धर्मा राऊत, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे कार्यक्रम व्यवस्थापक राजू सरतापे यांची उपस्थिती होती.