वाशिमचे युवक वळले मत्स्य व्यवसायाकडे!
By admin | Published: September 19, 2016 07:32 PM2016-09-19T19:32:13+5:302016-09-19T19:32:13+5:30
सन २०१३ ते २०१५ या तीन वर्षांत पावसाने दगा दिल्याने परंपरागत मत्स्यव्यवसाय करणारा भोई समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता.
सुनील काकडे
वाशिम, दि. १९ : सन २०१३ ते २०१५ या तीन वर्षांत पावसाने दगा दिल्याने परंपरागत मत्स्यव्यवसाय करणारा भोई समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता. यंदा मात्र दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणं पाण्याने तुडूंब भरल्याने मत्स्यव्यवसायाला पुन्हा एकवेळ ह्यअच्छे दिनह्ण आले असून या व्यवसायाकडे भोई समाजातील असंख्य युवक वळले आहेत.
गत तीन वर्षात पावसाने मोठा दगा दिल्यामुळे भोई समाजाचा पारंपरीक व्यवसाय संकटात सापडला होता. यावर्षी मात्र सुरूवातीपासून दमदार स्वरूपात कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १२२ लघूप्रकल्प तुडूंब भरले असून यामध्ये चालणाऱ्या मत्स्यव्यवसायाला अचानक गती प्राप्त झाली आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या समाजातील अधिकांश कुटूंबं मच्छिमार असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. विशेष बाब म्हणजे युवकवर्गही आता या व्यवसायाकडे वळला असून निसर्गाने चांगली साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते, अशी आशा राजू सहातोंडे या युवकाने व्यक्त केली.