विभागात वाशिमचा डंका!
By admin | Published: May 31, 2017 02:21 AM2017-05-31T02:21:07+5:302017-05-31T02:21:07+5:30
अमरावती विभाग : बुलडाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी, अकोला ८९.८१ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात अमरावती विभागातून वाशिम जिल्हा प्रथम तर बुलडाणा जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.३१ टक्के, बुलडाणा जिल्हा ९०.८१ टक्के, अकोला जिल्ह्याचा निकाल ८९.८१ टक्के, अमरावती जिल्हा ८९.९५ टक्के तर यवतमाळ जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक कमी ८४.८० एवढा लागला आहे. सदर वृत्त लिहिस्तोवर लोकमतकडे प्राप्त असलेल्या माहितीनुसार, वाशिममधून विनिता बज, बुलडाण्यातून श्रुती भडेच तर अकोल्यातून शर्व पाटील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
वाशिम जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार ७४३ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९१.३१ अशी आहे. वाशिम येथील हॅपी फेसेस स्कूलची विद्यार्थिनी विनिता बजने ९४.९२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.
बुलडाणा जिल्ह्याची निकालाची टक्केवारी यावर्षी वाढली असून, विभागातून दुसरा येण्याचा मान मिळाला आहे. यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९०.८१ टक्के लागला. निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९३.४९ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील ३१ हजार ९०० विद्यार्थी नोंदविल्या गेले होते.
जिल्ह्यातून श्रुती भडेच ९६.६१ गुणांसह प्रथम क्रमांकावर आली. श्रुती भडेच भारत विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
अकोला जिल्ह्याचा निकाल यावर्षी ८९.८१ लागला असून, यावर्षीदेखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.०१ तर मुलींची टक्केवारी ९३.१४ अशी आहे. जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान शर्व रणजित पाटील याने मिळवला आहे. शर्वने ९५.८५ टक्के गुण मिळवले असून, तो डवले कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.