बीडमध्ये धुवांधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला
By admin | Published: September 23, 2016 09:36 AM2016-09-23T09:36:27+5:302016-09-23T09:36:59+5:30
संपूर्ण बीड जिल्ह्यात धुवांधार पाऊस सुरू नदी, नाले आणि ओढे फुल्ल झाले आहेत.
Next
>प्रताप नलावडे, ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २३ - पहाटे तीन वाजल्यापासून संपूर्ण बीड जिल्ह्यात धुंवाधार पाऊस सुरू नदी, नाले आणि ओढे फुल्ल झाले आहेत. गावागावातील नदी नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बीड शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून शहर जलमय झाले आहे. पहाटेपासूनच ढगांचा गडगडाट आणि वीजेच्या कडकडाटाने बीडकरांना हादरवून सोडले आहे . गेली चार वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसणाºया जिल्हा अवघ्या चार तासात जलमय झाल्याने हा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे.
शेतात पाणी घुसल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत.
बीड शहरातील बिंदसुरा नदी ओसंडून वाहू लागली असून धरणातील पाण्याची पातळीही वाढू लागली आहे. संपूर्ण पावसाळ्यात बिंदसुरा धरण कोरठे ठाक च होते. शहरातील सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. वडवणी तालुक्यात पावसान कहर केला असून संपूर्ण शहरच जलमय झाले आहे. या शहराला पाणी पुरवठा करणारा मामला तलाव तुडुंब भरला आहे. तलावातून पाणी वाहू लागल्याने मामला गावाचा संपर्क तुटला आहे. गावाबाहेर शेतात गेलेले शेतकरीही तेथेच अडकून पडले आहेत.
परळीत नागापूर धरणातील पाण्याची पातळी लक्षणीय वाढली असून २८ फुट क्षमतेच्या या धरणातील पाणी पातळी २६ फुट इतकी झाली आहे. आष्टी तालुक्यात रात्रभर संततधार सुरूच असून सकाळी पावसाचा जोर वाढला आहे. सिरसाळा परिसरात मोहा नदीला पाणी वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भोपला तलावही तुडुंब भरला आहे. धारूर येथे वाण नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. माजलगाव परिसरात पावसाचा जोर वाढल्याने येथील धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. सध्या हे धरण मृतसाठ्यात आहे. तालखेड परिसरातही रात्रभर पळसखेडाची होळना नदीही तुडुंब भरून वाहू लागली आहे. ही नदी दुथडी वाहतानचे दृष्य तब्बल तीस वर्षांनी पाहण्यास मिळाल्याचे गावकरी सांगतात. पाऊस सुरूच होता. बीड तालुक्यातील केतुरा परिसरात इद्रुपा नदी तुडुंब वाहू लागली असून नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे.