सांडपाणी प्रक्रिया करून उद्योगांना देणार
By Admin | Published: November 25, 2015 04:01 AM2015-11-25T04:01:03+5:302015-11-25T04:01:03+5:30
कारखाने, एमआयडीसी तसेच इतर मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना नदी अथवा धरणासारख्या जलस्रोतातील पाणी थेट दिले जाणार नाही़ त्याऐवजी नगरपालिका किंवा महापालिकांचे सांडपाणी प्रक्रिया करून दिले जाईल़
सोलापूर : कारखाने, एमआयडीसी तसेच इतर मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना नदी अथवा धरणासारख्या जलस्रोतातील पाणी थेट दिले जाणार नाही़ त्याऐवजी नगरपालिका किंवा महापालिकांचे सांडपाणी प्रक्रिया करून दिले जाईल़ उद्योग आणि सांडपाणी पुनर्वापराबाबत शासन पातळीवर धोरण निश्चित केले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुढील दोन वर्षांत किमान ५ महापालिकांमध्ये १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़ मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली़
एनटीपीसी प्रकल्पासाठी उजनीतून पाणी घेण्यासाठी जलवाहिनी टाकली आहे़ तिचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल. प्रक्रिया करूनच एनटीपीसीला हव्या त्या पद्धतीच्या गुणवत्तेचे पाणी देण्याचा निर्णय एनटीपीसीनेदेखील तत्त्वत: मंजूर केला आहे़ त्यामुळे आता मनपा आणि एनटीपीसी यांच्यात एक सामंजस्य करार होईल़ हेच मॉडेल राज्यभरात वापरले जाईल, असे त्यांनी सांगितले. सांडपाण्यावर प्रक्रिया झाल्यास नदीचे प्रदूषणदेखील रोखता येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला़ (प्रतिनिधी)
हागणदारीमुक्त नगरपालिका आणि महापालिकांसाठी २ टक्के व्याजाने ३० वर्षांसाठी कर्ज देण्यासाठी एक कंपनी स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले़ पुणे जिल्ह्यातील धरणांतून १० टीएमसी पाणी उजनीमध्ये सोडण्याच्या निर्णयाचे पालन होईल, असेही ते म्हणाले.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी समितीतर्फे मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपुर्द केला़