व्यापारी संकुलात शिरले सांडपाणी
By admin | Published: September 20, 2016 02:16 AM2016-09-20T02:16:26+5:302016-09-20T02:16:26+5:30
देहूरोड बाजारपेठेतील व्यापारी संकुलात पहाटेपासून मैलासांडपाणी, पाणी शिरल्याने येथील गाळाधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले
देहूरोड : कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या देहूरोड बाजारपेठेतील व्यापारी संकुलात पहाटेपासून मैलासांडपाणी, पाणी शिरल्याने येथील गाळाधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, एका पतसंस्थेची कागदपत्रे या घाण पाण्याने पूर्ण खराब झाली आहेत. गेल्या आठवड्यात व्यापारी संकुलासमोरील जुने स्वच्छतागृह पाडल्याने त्या ठिकाणचे चेंबर व वाहिनी तुंबल्याने देहूरोड बाजारपेठेतील सर्व सांडपाणी मोठ्या प्रमाणात थेट संकुलाच्या परिसरात जमा झाल्याने हा प्रकार घडल्याचे गाळाधारकांनी सांगितले. संबंधित भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या बोर्ड सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
गेल्या महिन्यात बोर्डाच्या बैठकीत निर्णय झाल्यानुसार बोर्डाच्या वतीने नेहरू मंगल कार्यालय व बोर्डाच्या व्यापारी संकुलासमोरील जुने स्वच्छतागृह गेल्या आठवड्यात पाडण्यात आले होते. त्यामुळे या भागातील स्वच्छतागृहाजवळचे चेंबर, सांडपाणीवाहिनी राडारोडा जाऊन बंद झाली होती. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसानंतर संपूर्ण बाजारपेठेतून येणारे सर्व सांडपाणी वाहून नेहरू कार्यालयासमोरील मुख्य गटारात आल्यानंतर येथील स्वच्छतागृहाजवळ असलेले चेंबर व सांडपाणी वाहिनी तुंबल्याने त्याचा फुगवटा थेट व्यापारी संकुलात गेला.
त्यानंतर निरीक्षक सय्यद व गायकवाड यांनी तातडीने चेंबरजवळ असणाऱ्या वाहिनी यंत्राच्या साह्याने फोडून पाण्याला मार्ग मोकळा करून देण्याचा निर्णय घेतला. दुपारी तीनच्या सुमारास व्यापारी संकुलातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली होती. मात्र, परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. (वार्ताहर)
संकुलाच्या तळमजल्यावरील गाळ्यांत सांडपाणी गेले होते. लाला लजपतराय पतसंस्था कार्यालय, डिजिटेक कॉम्प्युटर्स यांच्यासह दहा-बारा गाळ्यांत सांडपाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोर्डाचे सदस्य व पतसंस्थेचे अध्यक्ष रघुवीर शेलार, गाळाधारक प्रवीण बालघरे, विकास तुळवे यांनी सांगितले. शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी त्यांना व्यापारी संकुलातील गाळ्यांत सांडपाणी शिरल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी तातडीने तेथे येऊन पाहणी करून बोर्डाच्या आरोग्य विभागासह स्थापत्य विभागाला माहिती दिली. त्यानंतर दुपारी तीनपर्यंत पाणी उपसण्याचे काम सुरू होते. बोर्डाचे अधिकारी आल्यानंतर शेलार, कार्यालय अधीक्षक श्रीकांत लष्करे, अभियंता प्रवीण गायकवाड, आरोग्य निरीक्षक किरण गोंटे, एम ए सय्यद यांनी पाहणी केली.