‘विमानतळाजवळील कचरा नियमित उचलणार’
By admin | Published: January 15, 2015 05:29 AM2015-01-15T05:29:42+5:302015-01-15T05:29:42+5:30
विमानतळाजवळील कचरा नियमित उचलला जाईल, अशी हमी महानगरपालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून दिली
मुंबई : विमानतळाजवळील कचरा नियमित उचलला जाईल, अशी हमी महानगरपालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून दिली. विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने तेथे पक्ष्यांचा वावर अधिक असतो. पक्ष्यांमुळे विमान अपघाताचा धोका असतो. त्यामुळे येथे साफसफाई ठेवावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते दत्ता माने यांनी दाखल केली आहे.
याचे प्रत्युत्तर सादर करताना पालिकेने ही हमी दिली. विमानतळाच्या १० किमीच्या परिसरात २,६९४ कचरापेट्या आहेत. तेथील कचरा नियमित उचलला जातो. याव्यतिरिक्त कचरापेट्यांवर मोठी प्लास्टिकची बॅग ठेवण्याचा विचार आहे. याने तेथे पक्षी येणार नाहीत. येथील खुले नाले नियमित साफ केले जाणार आहेत.
येथील सर्व मटण व चिकन शॉप तसेच हॉटेल्स व बारमालकांना कचऱ्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, या मालकांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडेही देण्यात आली आहे. त्यानुसार कचरा करणाऱ्या मालकांवर कारवाई केली जाईल, असे पालिकेने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
गेल्या वर्षी ६४ वेळा पक्ष्यांनी विमानाला धडक दिली व त्याआधीच्या वर्षी ५२ वेळा हा प्रकार घडला आहे. याची दखल घेत न्यायालयाने येथील कचरा उचलण्याची हमी पालिकेची असून, यासाठी विशेष धोरण आखले गेले पाहिजे, असे मत गेल्या सुनावणीला व्यक्त केले होते. (प्रतिनिधी)