औरंगाबादची शान वाढविणाऱ्या दरवाजांचे विद्रुपीकरण

By Admin | Published: February 7, 2017 12:40 AM2017-02-07T00:40:46+5:302017-02-07T00:40:46+5:30

ऐतिहासीक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांची राजधानी आणि जागतिक पातळीवर '५२ दरवाजांचे शहर' म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे.

Wasting of Aurangabad's growing doors | औरंगाबादची शान वाढविणाऱ्या दरवाजांचे विद्रुपीकरण

औरंगाबादची शान वाढविणाऱ्या दरवाजांचे विद्रुपीकरण

googlenewsNext

tyle="text-align: justify;">सोमनाथ खताळ

औरंगाबाद, दि. 7 - ऐतिहासीक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांची राजधानी आणि जागतिक पातळीवर '५२ दरवाजांचे शहर' म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. शहराभोवती ५२ दरवाजे व तटबंदी उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे औरंगाबादची वेगळी ओळख आहे. हे दरवाजे आकर्षक असून शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून यातील काही दरवाजांचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येत आहे. तर काही दरवाजांची पडझड झाली आहे. त्यामुळे या दरवाजांचे अस्तीत्व तर धोक्यात आलेच आहे शिवाय पोस्टरबाजी आणि परिसरातील घाणीच्या साम्राज्यामुळे दरवाजांचे विद्रुपीकरण झाले आहे.
ऐतिहासिक, प्राचीन आणि विविध पर्यटनस्थळांचा वारसा औरंगाबाद शहराला लाभला आहे. मागील काही वर्षांत शहराचा झपाट्याने विस्तार झाला आहे. कधी काळी दरवाजांच्या आत असणारे हे शहर सद्यस्थितीत ऐतिहासिक तटबंदीच्या बाहेर विस्तारले आहे. शहराची ऐतिहासीक ओळख निर्माण करणाऱ्या या दरवाजांची पुरातत्व विभागाने वेळोवेळी सुरक्षा आणि दुरूस्ती करणे गरजेचे होते. परंतु असे झाले नाही. प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष ऐतिहासीक स्थळांसाठी धोकादायक बनत आहे. त्यामुळे त्यांची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली आहे.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध पर्यटन आणि ऐतिहासीक स्थळ आहेत. हे पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. औरंगाबाद शहरात कोणत्याही मार्गाने ‘एन्ट्री’ करायची असेल तर त्यांना ऐतिहासीक ५२ दरवाजांपैकी एका दरवाजाचे दर्शन होते. परंतु ज्या दरवाजांजवळ पूर्वी पर्यटक मुद्दामहून थांबून फोटो काढायचे, आज त्याच दरवाजांना पर्यटक केवळ दुरून पाहणे पसंत करीत असल्याचे दिसून येत आहे.

पैठण गेट नावालाच
इतर दरवाजांपेक्षा पैठण गेटीच अवस्था बऱ्यापैकी चांगली आहे. परिसरात रंगरंगोटी केल्यामुळे इथे सर्वांच्या नजरा क्षणभर थांबतात. परंतु अपेक्षेप्रमाणे येथे सुविधा नाहीत किंवा दुरूस्ती झालेली नाही. तसेच पुर्ण गेटला रंगरंगोटी केलेली नाही. संबंधित विभागाचे लोक इकडे फिरकत नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. रात्रीच्यावेळी या गेटच्या परिसरातील भिकारी किंवा गरीब लोक आश्रय घेत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

महमंद दरवाजाला पडल्या भेगा
ऐतिहासीक पाणचक्कीजवळ हा दरवाजा आहे. परंतु या दरवाजाची सद्यस्थितीतील अवस्था पाहिली तर हा दरवाजा कोणत्याही क्षणी कोसळण्याची भिती आहे. या दरवाजाला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. तर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. दरवाजाच्याा आतील भागातही भेगा पडल्याचे दिसून येते. त्यामुळे या दरवाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

बारापुल्ला दरजाजवळ घाणीचे साम्राज्य
मील कॉर्नरच्या परिसरात हा दरवाजा आहे. या दरजाजवळूनच एक छोटी नदी गेलेली आहे. या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. तसेच या दरवाजाच्या परिसरातही घाणीचे साम्राज्य दिसून आले. यामुळे दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीमुळे पर्यटकांमधून नाराजीचा सुर निघत आहे.

दुर्लक्ष आणि हालगर्जीपणा
पुरातत्व विभाग व महापालिकेच्यावतीने या दरवाजांची वेळच्यावेळी दुरूस्ती आणि रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. परंतु संबंधित दोन्ही विभाग याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय ज्या दरवाजांना रंग देण्यात आला, तो रंग अवघ्या काही महिन्यांतच निघून गेला आहे. यावरून या विभागाचा हालगर्जीपणाही समोर येतो. ऐतिहासीक वास्तुंचा ठेवा जपण्यासाठी या विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी औरंगाबादकरांसह पर्यटकांमधून केली जात आहे.

हा आहे अधिनियम
महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अन्वये हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. जो कोणी सदर संरक्षित स्मारकाचा नाश करील, काढून घेईल, त्याचे नुकसान करील, त्यात फेरफार करील, खराब करील, तो या अधिनियमानुसार ३ महिने कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंडास किंवा दोन्हीस पात्र होतो. परंतु कारवाई होत नसल्याने बिनधास्त पोस्टरबाजी केली जात आहे.

 

Web Title: Wasting of Aurangabad's growing doors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.