उष्णतेचा कहर, आणखी तीन बळी
By admin | Published: May 20, 2016 01:48 AM2016-05-20T01:48:45+5:302016-05-20T01:48:45+5:30
अकोला जिल्ह्यात तापमानाचा कहर; उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली.
अकोला: जिल्ह्यात तापमानाचा कहर सुरूच असून, गुरुवारी उष्माघातामुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.
बोरगाव मंजू येथील गजानन मोहे (६0) हे बुधवारी नेहमीप्रमाणे गावातील शेळ्य़ा घेऊन जंगलात घेऊन गेले होते. प्रखर उन्हापासून बचाव करण्यासाठी ते झाडाखाली विसावले; मात्र अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते कोसळले. ही घटना माहीत पडताच नातेवाइकांनी त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात हलविले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गजानन मोहे यांच्यावरच कुटुंबाचा भार होता. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे मोहे कुटंब उघड्यावर पडले असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मोहे कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गांधीग्राम येथील अरुण भाऊराव मांजरे ( ६0) या वृद्ध मनोरुग्णाचा उन्हामुळे मृत्यू झाला. मांजरे हे गावात नेहमी भटकत होते. १८ मे रोजी तीव्र उन्हामध्ये अनेकांना मांजरे फिरताना आळळले. उन्ह जिव्हारी लागल्याने ते मरण पावले.
तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे उष्माघाताने शेतमजूर मृत्यूमुखी पडला. शांताराम शंकर खोडे (४१) हे शेतमजुरीकरिता मिळेल तेथे होते. १९ मे रोजी भुईमुगाचे कुटार आणण्याकरिता शेतात गेले. घरी परत आल्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली व ते खाली कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक शांताराम खोडे अविवाहित होते.
दरम्यान, बुधवारी भांबेरी येथील गणेश गुलाबराव खंडागळे (५0) आणि चिखलगाव येथील एका ६५ वर्षे अनोळखी इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाला.