‘मोबाईल लॅब’द्वारे वायुप्रदूषणावर ‘वॉच’

By admin | Published: November 11, 2014 01:00 AM2014-11-11T01:00:24+5:302014-11-11T01:00:24+5:30

गेल्या काही काळापासून देशातील मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वायुप्रदूषणाची पातळी वाढीस लागली आहे. उपराजधानीच्या वैज्ञानिक विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘नीरी’ने

'Watch' on air pollution through mobile lab | ‘मोबाईल लॅब’द्वारे वायुप्रदूषणावर ‘वॉच’

‘मोबाईल लॅब’द्वारे वायुप्रदूषणावर ‘वॉच’

Next

‘नीरी’चा अभिनव उपक्रम : उपराजधानीतील घातक वायूंच्या पट्ट्यांची कळणार माहिती
योगेश पांडे - नागपूर
गेल्या काही काळापासून देशातील मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वायुप्रदूषणाची पातळी वाढीस लागली आहे. उपराजधानीच्या वैज्ञानिक विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘नीरी’ने (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणखी एक विधायक पाऊल उचलले आहे. शहरातील कुठल्या भागात नेमके जास्त वायुप्रदूषण आहे याचा अभ्यास करण्यासाठी ‘नीरी’तर्फे विशेष ‘मोबाईल लॅब’ची निर्मिती करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांनी युक्त अशा या छोटेखानी प्रयोगशाळेच्या माध्यमातून शहरातील निरनिराळ्या ठिकाणी हवेतील घातक वायूंची नोंद घेण्यात येत आहे.
‘नीरी’च्या संशोधकांकडून सातत्याने वायुप्रदूषण आणि त्याच्याशी निगडित निरनिराळ्या मुद्यांवर संशोधन करण्यात येते. याकरिता नेमकी आकडेवारी आवश्यक असते. संशोधकांच्या प्रयत्नातून ही ‘मोबाईल लॅब’ साकारण्यात आली. ‘मोबाईल एमिशन मॉनिटरिंग अ‍ॅन्ड कंट्रोल लेबॉरेटरी’ असे नाव असलेल्या या ‘लॅब’चे काम नागपूर तसेच शहराच्या आजूबाजूच्या औद्योगिक क्षेत्रात चालते. येथील वातावरणातील निरनिराळ्या वायूंच्या घटकांची माहिती लगेच उपलब्ध व्हावी, अशी यंत्रणा यात उभारण्यात आली आहे. या अभ्यासातून कुठल्या भागात वायूप्रदूषण जास्त प्रमाणात आहे व कुठे तत्काळ दखल घेण्याची आवश्यकता आहे, ही बाब अधोरेखित करणे शक्य झाले आहे.
नागपुरातील वातावरणातील घातक वायूंचा प्रभाव कमी व्हावा, हे ‘सीएसआयआर-नीरी’चे उद्दिष्ट आहे. या ‘मोबाईल लॅब’मुळे ‘नीरी’च्या संशोधकांना अचूक व वेगवान पद्धतीने वायुप्रदूषणाचा ‘डेटा’ मिळू शकेल. तसेच वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यास मदतदेखील होईल, असे मत ‘नीरी’चे संचालक डॉ. सतीश वटे यांनी व्यक्त केले आहे.
‘मोबाईल लॅब’चे अत्याधुनिक अंतरंग
वायुप्रदूषणाचा अभ्यास करणारी ही ‘मोबाईल लॅब’ एका छोटेखानी बसमध्ये उभारण्यात आली आहे. यातील ‘ईएमयू’ (एमिशन मॉनिटरिंग युनिट) व ‘ईसीयू’ (एमिशन कंट्रोल युनिट) हा महत्त्वाचा भाग आहे.
शिवाय ‘ग्रीन हाऊस गॅसेस’, ‘सीएफसी’ (क्लोरोफ्लुरोकार्बन्स) आणि इतर ५० प्रकारच्या घातक वायूंची तपासणी करण्यासाठी ‘एफटीआयआर’ (फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कॉपी)देखील या ‘लॅब’मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ‘फ्ल्यू गॅस अ‍ॅन्ड एमिशन मॉनिटरिंग अ‍ॅनालायझर’, ‘हीट एक्सचेंजर’, ‘मल्टी सायक्लॉन’, ‘बॅग फिल्टर’ यांचादेखील समावेश आहे. शिवाय उच्च दर्जाचे ‘फ्लेक्सी पाईप्स’देखील येथे वापरण्यात आले आहेत.
चौकाचौकांत वाहनातून निघणारे घातक वायू ओढून घेण्याची क्षमतादेखील या ‘लॅब’मध्ये आहे, हे विशेष.

Web Title: 'Watch' on air pollution through mobile lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.