भाजप कार्यकर्त्यांवर थेट ‘सीएम’चा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:07 AM2019-04-08T06:07:17+5:302019-04-08T06:07:23+5:30
मोबाइल अॅपचा वापर; अपलोड करावी लागते रोजच्या प्रचाराची माहिती
- लक्ष्मण मोरे
पुणे : लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्वच पक्षांनी मतदारांच्या गाठीभेटी, प्रचार सभा, कोपरा सभांवर भर द्यायला सुरुवात केली आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू आहे. केंद्रातील सत्तेसाठी महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा मिळणे महत्वाचे असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारावर नजर ठेवली असून, मुंंबईतील त्यांच्या वॉररूममधून कार्यकर्त्यांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे.
बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि मंडल प्रमुखांना मोबाइल अॅप देण्यात आले असून रोजच्या प्रचाराची माहिती कार्यकर्त्यांना त्यावर अपलोड करावी लागते आहे. तिची खातरजमा करण्यासाठी फडणवीसांच्या मुंबई कार्यालयातून कार्यकर्त्यांना थेट फोन करून तपशील विचरला जात आहे.
भाजपने गेल्यावेळेप्रमाणेच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू ठेवला आहे. पक्षाने पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, मंडल प्रमुख अशी कार्यकर्त्यांची वर्गवारी केली आहे. तीन- चार बुथ प्रमुखांमागे एक शक्ती प्रमुख आहे. तीन-चार शक्ती प्रमुखांमागे मंडल प्रमुख आहे. या मंडल प्रमुखांचे ‘रिपोर्टिंग’ स्थानिक आमदारांकडे आहे. पन्ना प्रमुखांपासून केंद्रीय पातळीवरील कार्यकर्त्यांच्या कामाचे नियोजन ठरले आहे.
कार्यकर्त्यांचे काम झाले, की माहिती अपलोड करावी लागते. ती खरी किंवा खोटी याची खातरजमा वरिष्ठ पातळीवरून केली जाते. आलटून-पालटून कार्यकर्त्यांना कामाचा तपशील विचारणारे फोन मुंबईतून येत असून, त्यांच्याकडून माहितीची खातरजमा केली जाते.
पक्षाने या कार्यकर्त्यांसाठी खास मोबाइल अॅप तयार केले आहे. पक्षाच्या आदेशानुसार केलेली कामे, प्रचारविषयक कामे, तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यानंतर त्याचे छायाचित्र आणि माहिती या अॅपवर नियमित अपलोड करावी लागते.
अॅप डाउनलोड करताना कार्यकर्त्यांचे नाव, मोबाइल क्रमांक, जबाबदारी याची सर्व माहिती दिलेली असल्याने वरिष्ठ पातळीवरून थेट कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे सोपे होते.