मराठा मोर्चेकऱ्यांवर ड्रोन ठेवणार वॉच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 02:53 PM2017-08-08T14:53:23+5:302017-08-08T18:45:11+5:30

राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज व्याक्त केला जात आहे. मुंबईत होणाऱ्या या ना भूतो ना भविष्यति मोर्चाची सर्व तयारी झाली आहे.

Watch the dragon on Maratha Marches | मराठा मोर्चेकऱ्यांवर ड्रोन ठेवणार वॉच

मराठा मोर्चेकऱ्यांवर ड्रोन ठेवणार वॉच

Next
ठळक मुद्दे9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज.मुंबईतील वाहतूक सुरळित रहावी तसेच अन्य विपरीत गोष्टी होऊ नयेत म्हणून पोलिसांनीही आपली कंबर कसली आहे. 

मुंबई, दि. 8 - मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज व्याक्त केला जात आहे. मुंबईत होणाऱ्या या ना भूतो ना भविष्यति मोर्चाची सर्व तयारी झाली आहे.  

मोर्चादरम्यान मुंबईतील वाहतूक सुरळित रहावी तसेच अन्य विपरीत गोष्टी होऊ नयेत म्हणून पोलिसांनीही आपली कंबर कसली आहे. जागोजागी CCTV कॅमेरे आणि ड्रोनद्वारे मोर्चेकऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहतूक मार्गांत तात्पुरत्या स्वरूपाचे बदल कऱण्याच आले आहेत. उद्या सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत असतील. मोर्चाच्या दिवशी मुंबईकरांचे हाल होऊ नयेत, म्हणून वाहतुकीबाबतच्या सर्व सूचना ट्विटर आणि रेडिओवर देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. 

यासाठी 35 हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असून, या दिवशी पोलिसांची साप्ताहिक सुट्टी, रजा रद्द करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिसासह राज्य राखीव दल, क्यूआरटीसह विविध पथके तैनात असतील. आयुक्त दत्ता पडसलगीकर हे बंदोबस्ताचे नियोजन करीत असून, त्यासाठी सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिका-यांची सुकाणू समिती बनविण्यात आलेली आहे. शहर व उपनगरातील अपर आयुक्त व उपायुक्तांवर आपापल्या कार्यक्षेत्रातील बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे.

मोर्चादरम्यान उपस्थितांना सेवा-सुविधा द्याव्यात, यासाठी पोलीस उपायुक्त मनोज कुमार शर्मा यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना विनंती केली आहे. महात्मा गांधी रोडवरील दुभाजकावर ओ. सी. एस. वाहतूक चौक जंक्शन ते मेट्रो सिनेमा जंक्शनपर्यंत बॅरिकेट्स उभारावे. आझाद मैदान परिसरात मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवतात एखादी घातपाती वस्तू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, मैदानावरील गवताची कापणी करावी, अशी मागणी मनोज कुमार शर्मा यांनी अजय मेहता यांच्याकडे केली आहे.


अशी आहे आचारसंहिता -
- मुंबई मराठा क्रांती मोर्चा मूक असून, कोणताही आंदोलक घोषणा देणार नाही.
- मोर्चात अधिकृत बॅनरशिवाय कोणतेही राजकीय, वैयक्तिक संस्था व संघटनांचे बॅनर्स चालणार नाहीत.
- कोणत्याही जाती किंवा धर्माविरोधातील घोषणा किंवा मागण्यांचे बॅनर झळकविण्यास मनाई असेल.
- मोर्चात स्वयंशिस्त पाळताना पोलिसांना सहकार्य केले जाईल.
- व्यसन केलेल्या आंदोलकांना मोर्चात सामील होता येणार नाही.
- घाई गडबड न करता, महिला, लहान मुले व वृद्धांना पुढे जाऊ दिले जाईल.
- मोर्चादरम्यान जमा होणाºया पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पाऊच आणि कचरा गोळा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- मोर्चात संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास, त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
- मोर्चात कुणीही आंदोलक वाट चुकल्यास, मराठा स्वयंसेवक किंवा पोलिसांशी संपर्क साधावा. 


दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी

मराठा मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.  मोर्चामुळे शालेय वाहतुकीस यामुळे अडचण निर्माण झाल्यास विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शक्यता आहे, असे सांगत शिक्षण विभागानं बुधवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील सरकारी शाळांसहीत खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.  

अफवांवर विश्वास ठेवू नका
मराठा क्रांती मोर्चा काही कारणांमुळे विस्कळीत व्हावा, या हेतूने अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. गाडीवर स्टीकर नसेल तर मुंबईत प्रवेश मिळणार नाही, ट्रॅफिक जाम आहे, अशा प्रकारचे विविध संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. तरी मराठा बांधवांनी या अफवांला बळी न पडता मुंबई गाठायची आहे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समितीने केले आहे.

Web Title: Watch the dragon on Maratha Marches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.