दुष्काळाच्या एसटीलाही झळा; २० दिवसांत ४३ कोटींचे उत्पन्न घटले
By admin | Published: May 23, 2016 04:29 AM2016-05-23T04:29:14+5:302016-05-23T04:29:14+5:30
राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असतानाच त्याचा परिणाम एसटीवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. दुष्काळामुळे २0१६मध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांत उत्पन्न बुडाल्यानंतर एप्रिल
सुशांत मोरे, मुंबई
राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असतानाच त्याचा परिणाम एसटीवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. दुष्काळामुळे २0१६मध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांत उत्पन्न बुडाल्यानंतर एप्रिल महिन्यात लग्नसराईमुळे एसटी महामंडळाला थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा एकदा दुष्काळाची झळ वाढली असून, मे महिन्याच्या २० दिवसांत ४३ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले आहे. अशीच परिस्थिती जूनपर्यंत राहिली तर १00 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दुष्काळी परिस्थिती खूपच तीव्र झाली असून, पाण्याअभावी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक त्रस्त झाले आहेत. त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावरच होत आहे. दुष्काळामुळे अनेक जण स्थानिक पातळीसह लांब पल्ल्यावरचा प्रवासही टाळत आहेत. प्रवास टाळत असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. मागील वर्षीच्या १ ते २0 मेपर्यंत भारमान हे जवळपास ६५ टक्के एवढे होते. या वर्षीच्या मे महिन्यातील याच दिवसांत भारमान ५९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तुलना केल्यास जवळपास सहा टक्क्यांनी भारमान घसरले असून, त्यामुळे महामंडळाला मे महिन्यात ४३ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
मराठवाडा विभागात औरंगाबाद क्षेत्रातील औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी विदर्भात नागपूर क्षेत्रातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा तर खान्देशात नाशिक क्षेत्रातील जळगाव, अहमदनगर, धुळे, नाशिकमध्ये दुष्काळाचा एसटीवर सर्वांत जास्त परिणाम झाला आहे. एप्रिलनंतर दिलासा नाहीच : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत दुष्काळामुळे एसटीला ३१ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले होते. एप्रिल महिन्यात लग्नसराई असल्याने भारमान थोडेफार वाढले होते. मात्र मे महिना सुरू होताच भारमान हळूहळू घसरू लागले. वाढते तापमानही कारणीभूत : दुष्काळाबरोबरच राज्यातील काही भागांत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढही झाली आहे.
त्यामुळे अनेक जण प्रवास टाळत असून, त्याचा थेट परिणाम एसटीच्या वाहतुकीवर होत असल्याचे सांगण्यात आले. 1मुंबई क्षेत्रातील (मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, ठाणे)४.६५ टक्क्यांनी, पुणे क्षेत्रात(कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर) भारमान ५ टक्क्यांनी आणि अमरावती क्षेत्रातील (अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ) भारमान ५.८१ टक्क्यांनी घसरले आहे. 2मराठवाड्यात मे महिन्यातील याच दिवसांत तुलनेने भारमान जास्त असते. मागील वर्षीच्या मे महिन्यात मराठवाड्यात ६९ टक्के असणारे भारमान यंदाच्या मे महिन्यात तब्बल आठ टक्क्यांनी घसरले आहे. तर विदर्भात जवळपास ६ टक्क्यांपर्यंत भारमान घसरले
असून, खान्देशात हेच प्रमाण सात टक्क्यांपर्यंत आहे3राज्यात दुष्काळी परिस्थिती खूपच तीव्र झाली असून, पाण्याअभावी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक त्रस्त झाले आहेत. त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावरच होत आहे. दुष्काळामुळे अनेक जण स्थानिक पातळीसह लांब पल्ल्यावरचा प्रवासही टाळत आहेत. अशीच परिस्थिती जूनपर्यंत राहिली तर १00 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.