कुंभमेळ्यात ‘वॉण्टेड’ गुन्हेगारांवर ‘वॉच’

By admin | Published: September 6, 2015 12:46 AM2015-09-06T00:46:03+5:302015-09-06T00:46:03+5:30

खून, दरोडा, चोरी, दहशतवादी कारवाई तसेच विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असताना तुरुंगातून फरार झालेले, पॅरोलवर सुटल्यानंतर परागंदा झालेले गुन्हेगार ओळख लपविण्यासाठी साधूंची

'Watch' on 'Wanted' criminals in Kumbh Mela | कुंभमेळ्यात ‘वॉण्टेड’ गुन्हेगारांवर ‘वॉच’

कुंभमेळ्यात ‘वॉण्टेड’ गुन्हेगारांवर ‘वॉच’

Next

- विजय मोरे,  नाशिक
खून, दरोडा, चोरी, दहशतवादी कारवाई तसेच विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असताना तुरुंगातून फरार झालेले, पॅरोलवर सुटल्यानंतर परागंदा झालेले गुन्हेगार ओळख लपविण्यासाठी साधूंची वेषभूषा करीत असल्याचे अनेकदा समोर आले आहे़ त्यादृष्टीने नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘वॉण्टेड’ गुन्हेगारांना शोधण्यासाठी राज्याच्या गुन्हे शोध पथकाचे (डिटेक्शन आॅफ क्राइम ब्रँच - डीबी) कर्मचारी येथे दाखल होणार असून, त्यांचा गुन्हेगारांवर ‘वॉच’ असणार आहे़
कुंभमेळ्यात दहशतवादी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तसेच पर्वणीच्या संधीचे सोने करण्यासाठी स्थानिक चोरट्यांसह परप्रांतातील भामटेही पर्वणी साधतात. तपोवनात कारच्या काचा फोडून लाखो रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना तसेच महिलेची पर्स पळविल्याप्रकरणी परप्रांतीय महिलेसह तिच्या लहान मुलांना अटक करण्यात आली.
मागील सिंहस्थात कुटुंबीयांचा खून करून फरार झालेला गुन्हेगार पोलिसांना साधूच्या वेषात आढळला होता. राज्यातील दहा पोलीस आयुक्तालयांतील प्रत्येकी चार व जिल्हा पोलीस दलातील प्रत्येकी दोन असे ११० कर्मचारी गुप्त पद्धतीने फरार गुन्हेगारांचा कुंभमेळ्यात शोध घेणार आहेत़, असे शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले.

फरारी कैदी साधूच्या वेशात़़़
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी माधोसिंग ऊर्फ मंगलसिंग भोसले (३३, जामगाव, ता़ गंगापूर, जि़ औरंगाबाद) हा ६ एप्रिल २०१४ रोजी पळून गेला होता़ साधूचा वेश परिधान करून तो दिल्ली, हरिद्वाऱ, काशी या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी वास्तव्यास होता़ त्यानंतर तो नाशिकच्या सिंहस्थातही येणार होता़. मात्र तत्पूर्वीच कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या माधोसिंगला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली़

सिंहस्थातही फरारी गुन्हेगार येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे विविध जिल्ह्यांमधील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना नाशिकमध्ये पाठविण्याबाबत पोलीस महासंचालकांना पत्र पाठविले आहे़ बीडचे दोन कर्मचारी आले आहेत़ - सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक

Web Title: 'Watch' on 'Wanted' criminals in Kumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.