‘पाणी अडवा पाणी जिरवा’
By Admin | Published: May 16, 2016 03:12 AM2016-05-16T03:12:44+5:302016-05-16T03:12:44+5:30
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे आपण लहानपणापासून विज्ञानाच्या पुस्तकात वाचत आलेलो असतो
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे आपण लहानपणापासून विज्ञानाच्या पुस्तकात वाचत आलेलो असतो, पण त्याचा वैयक्तिक पातळीवर किती विचार करतो, ही बाब खरोखरच विचार करण्याजोगी आहे. परंतु आता त्याचाच विचार न केल्यामुळे महाराष्ट्राला सामोरे जावे लागणारा दुष्काळ हे त्याचेच फलरूप असल्याचे जाणवते. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही, असा विचार करून त्या दृष्टीने प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो.
पाणी वाचवण्यासाठी मी स्वत: माझ्या गावी आमच्या वाड्याभोवती औदुंबर, वड, पिंपळ इत्यादी वृक्षांची लागवड केली आहे. कारण अशा वृक्षांमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. आता तर तेथे अगदी ३० फुटांवर पाणी लागले असून, तेथे बोअरवेलची सुविधा लवकरच होणार आहे. वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनावरही भर देणे आवश्यक आहे. मी स्वत: या वर्षी पाण्याने होळी खेळण्यास नकार दिला. तसेच माझ्या घरातही पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करतो. घरात पाण्याचा गळका नळसुद्धा पाण्याच्या अपव्ययास कारण ठरतो. त्यामुळे मी अशा गोष्टींची दुरुस्ती करण्यास तत्परता दाखवतो.
गाडीची सफाईसुद्धा बरेचदा एसीच्या पाण्यातून केली जाते, तर कधी कोरड्या फडक्याने पुसून केली जाते. गाडी धुण्याऐवजी ती पुसून काढल्याने पाण्याची मोठी बचत होते आणि स्वच्छताही साधली जाते. पाणी वाचवण्याचा मूलमंत्र हा कोणी दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपल्या दैनंदिन कृतीतूनच शोधायचा असतो. पिण्यासाठी पाणी घेताना आवश्यक तेवढेच घ्यावे, नाहक पाणी वाया घालवू नये. त्यातूनच पाण्याचा संवर्धनात्मक विकास साधणे आपल्याला शक्य आहे आणि दुष्काळावर मात
करणेही!
च्शब्दांकन : तेजल गोलीपकर