वाळूउपसा करणाऱ्या चार बोटींना जलसमाधी
By Admin | Published: April 5, 2017 01:12 AM2017-04-05T01:12:36+5:302017-04-05T01:12:36+5:30
कानगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या चार बोटी जिलेटीनच्या साह्याने उडवून या बोटींना जलसमाधी देण्यात आली.
पाटस : कानगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या चार बोटी जिलेटीनच्या साह्याने उडवून या बोटींना जलसमाधी देण्यात आली.
तहसीलदार विवेक साळुंखे यांनी केलेल्या कारवाईबाबत वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. कानगावला भीमा नदीपात्रात बेकायदेशीर वाळूउपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार विवेक साळुंखे यांच्यासह महसुली पथक सकाळी ८ च्या सुमारास कानगावच्या भीमा नदीपात्रालगत गेले, त्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा सुरू होता.
या कारवाईत तहसीलदार विवेक साळुंखे, धनाजी पाटील, भगवान येडे, सुनील जाधव, विजय खारतुडे, संजय स्वामी, प्रकाश कांबळे, एस. एन. गायकवाड, अभिमन्यू जाधव, मालाजी जाधव, संतोष शितोळे यांच्यासह महसूल खात्याचे कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
>कडक कारवाई केली जाईल
गेल्या वर्षापासुन बेकायदेशीर वाळु वाहतुक करणाऱ्या वाळु माफियांच्या विरोधात कडक कारवाई सुरु केलेली आहे. अशीच कारवाई भविष्यातही केली जाईल. जो कोन्ही शासकीय नियम तोडुन वाळु वाहतुक करेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल
- विवेक साळुंखे (तहसीलदार, दौंड)
>वाळूचा ट्रक अंगावर घातला
कासुर्डी (ता. दौंड) येथील टोलनाक्यावर बेकायदेशीर वाळू थोपविण्यासाठी महसुल पथक तैनात करण्यात आले होते. या वेळी कासुर्डी टोलनाक्याच्या पुढे बेकायदेशीर वाळूवाहतूक करणारा ट्रक (एमएच १२ जेएफ ८७४२) दिसला. या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने एका तलाठ्याच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करून सरकारी कामकाजात आडथळा आणल्या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून ट्रक ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार विवेक साळुंखे यांनी दिली.