अमृततुल्य हॉटेलमध्ये ग्लासऐवजी पाण्याच्या बाटल्या
By Admin | Published: May 16, 2016 01:09 AM2016-05-16T01:09:03+5:302016-05-16T01:09:03+5:30
दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता प्रत्येकजण आपापल्या परीने पाणी कसे वाचवता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहे
पुणे : राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता प्रत्येकजण आपापल्या परीने पाणी कसे वाचवता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहे. हॉटेल, उसाची गुऱ्हाळे, चहाची दुकाने, रस्त्यावरील छोटी-मोठी खाद्य पदार्थांच्या दुकानांमध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पुण्याचे वैशिष्ट्य असलेले अमृततुल्य हॉटेलही पाणीबचतीच्या या मोहिमेत सहभागी झाले असून, ते वेगवेगळे उपाययोजना करून पाण्याची बचत करीत आहेत़ शहरातील कर्वे रस्ता, सदाशिव पेठ, नारायण पेठ येथील अमृततुल्य हॉटेलची लोकमत प्रतिनिधींनी पाहणी केली़ त्यात पाणी बचतीसाठीही हॉटेल अनेक नावीन्यपूर्ण उपाय करीत असल्याचे दिसून आले़
अमृततुल्य हॉटेल हे पुण्याचे एक वैशिष्ट्य आहे़ पंचतारांकित हॉटेलमध्ये नियमित जाणाऱ्या अनेकांना आपल्या कार्यालयातील कामाची सुरुवात अमृततुल्य हॉटेलमधील चहा पिऊन केल्याशिवाय चैन पडत नाही़ पूर्वी या हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी ग्राहकांना ग्लास व तांब्यांचा वापर केला जात होता. त्यामुळे ग्राहकांनी पाणी पिण्यास मागितले, तर त्यांना ग्लास भरून दिला जायचा. त्यातून ग्राहक थोडे पाणी प्यायचे आणि अर्धे पाणी टाकून द्यायचे. ही परिस्थिती लक्षात घेता आणि शहरातील पाण्याची अडचण समजून घेऊन अमृततुल्य चहाच्या प्रत्येक हॉटेलमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाण्याच्या बाटल्या ग्राहकांना पिण्यासाठी ठेवलेल्या आहेत.
।श्री नंदूक्षणी निवास अमृततुल्य हॉटेलमधील अश्विन त्रिवेदी म्हणाले की, अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. आधी पाण्याची समस्या एवढी भेडसावत नव्हती़ त्यामुळे काही उपाययोजना करण्याची गरज नव्हती; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.
>पाण्याचा दुहेरी वापर
नळाला पाणी असूनही पाणी वाया जाऊ नये म्हणून दोन वेगवेगळ्या भांड्यात पाण्याचा साठा करून काचेचे ग्लास स्वच्छ केले जातात. आणि उरलेले पाणी फरशी साफ करण्यासाठी वापरले जाते.
>प्लॅस्टिकच्या ग्लासचा वापर
पाण्याची नासाडी होऊ नये व ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या दिवशी पिण्याचे पाणी आले नाही, तर प्लॉस्टिकच्या ग्लासचा वापर केला जातो. या प्लॉस्टिक ग्लासमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते.
>या पाहणी दरम्यान हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला असता, माणकेश्वर अमृततुल्य हॉटेलचे शेखर चव्हाण म्हणाले की, पाणी म्हणजे जीवन. हे फक्त पुस्तकातच वापरले जाते; पण त्याचा प्रत्यक्ष जीवनातही अवलंब केला पाहिजे. याच उद्देशाने आम्ही गेल्या ४ वर्षांपासून पाण्याच्या ग्लासऐवजी बाटलीचा वापर करतो. त्यामुळे पाण्याची नासाडी होत नाही.
>दुष्काळाची परिस्थिती पाहता शहरात एकदिवसाआड पाणी सोडले जात आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पाणी जपून कसे वापरता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
- एम. पी. त्रिवेदी, नागनाथ भुवन अमृततुल्य, नारायण पेठ