पाणीच उठले गावकऱ्यांच्या ‘जीवना’वर

By admin | Published: January 11, 2015 12:45 AM2015-01-11T00:45:31+5:302015-01-11T00:45:31+5:30

पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे,

Water came out of the villagers 'life' | पाणीच उठले गावकऱ्यांच्या ‘जीवना’वर

पाणीच उठले गावकऱ्यांच्या ‘जीवना’वर

Next

फ्लोराईडयुक्त पाणी : लिंगटीतील अनेकांना ‘फ्लोरोसिस’ने जखडले!
प्रवीण पिन्नमवार - पांढरकवडा (यवतमाळ)
पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे, कुणाचे दात लाल-काळे तर कुणाला सरळ चालता येत नाही. फ्लोरोसिसने जखडलेले हे गाव आहे, पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी (भाडउमरी).
पांढरकवडापासून २० किलोमीटर अंतरावर लिंगटी आहे. ४०० ते ५०० लोकवस्तीचे गाव आदिवासीबहुल आहे. मात्र अज्ञान आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना उपलब्ध साधनसामग्रीवर चरितार्थ चालवावा लागतो. या गावाची मुख्य समस्या म्हणजे फ्लोराईडयुक्त पाणी आणि हेच पाणी आता नागरिकांना मरणाच्या दाढेत ढकलत आहे.
गावात प्रवेश करताच ४० वर्षीय श्रावण पेंदोर भेटला. कमरेतून वाकलेला आणि मान हलवता न येण्याच्या स्थितीत तो जगत आहे. अशा स्थितीत तो आपले काम कसेबसे करीत होता. त्याची संपूर्ण पाठही अकडल्याचे दिसत होते. याबाबत विचारले असता श्रावण म्हणाला, ‘हा त्रास पाच ते सहा वर्षांपासून आहे. नागपूरला रुग्णालयातही जाऊन आलो. त्याठिकाणी ५० ते ६० हजार खर्च येईल, असे सांगितले. आर्थिक परिस्थिती नसल्याने उपचार न घेताच गावी परत आलो आणि आज अशा स्थितीत तुमच्यासमोर उभा आहे’. तानाबाई नैताम या ५० वर्षीय महिलेच्या हाताची सर्व बोटे लुळी पडली होती. त्याही कमरेतून वाकून चालत होत्या. तानाबाईशी संवाद सुरू असतानाच एक २० वर्षीय तरूण अडखळत चालत आला. त्याला विचारले तर तोही चार ते पाच वर्षांपासून हाडाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे समजले. बघता-बघता कमलाबाई पेंदोर, जंगोबाई सुरपाम, भीमराव आत्राम, परशराम आत्राम असे अनेक स्त्री-पुरूष तेथे गोळा झाले. प्रत्येकाला हाडाशी संबंधित कोणता ना कोणता जडलेला होता. या भागात जमिनीतील पाण्यात फ्लोराईड हा क्षार अधिक प्रमाणात आहे. गावात असलेली विहीर ही गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. याच विहिरीतून मिळणारे फ्लोराईडयुक्त पाणी गावकऱ्यांसाठी घातक ठरत आहे.
काय आहे फ्लोराईड ?
फ्लोराईड हा क्षार असून पाण्याच्या माध्यमातून तो शरीरात जातो. फ्लोराईडचे शरीरातील प्रमाण वाढल्याने फ्लोरोसिस हा आजार होतो. यात हाडांवर परिणाम होऊन ती वाकतात तसेच हाडे ठिसूळ होतात व सहज तुटतात, दातही वाकडे तिकडे होतात. त्याला डेन्टल फ्लोरोसिस म्हणतात. हा आजार टाळण्यासाठी फ्लोराईडयुक्त पाणी पिण्यासाठी वापरू नये, हाच उपाय असल्याचे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके यांनी सांगितले.

Web Title: Water came out of the villagers 'life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.