गाद्या टाकूनही पाणी तुंबवतील
By admin | Published: May 18, 2016 02:20 AM2016-05-18T02:20:45+5:302016-05-18T02:20:45+5:30
उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईमुळे यंदा मुंबईची तुंबापरी होण्याच्या भीतीने शिवसेना धास्तावली आहे़
मुंबई : उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईमुळे यंदा मुंबईची तुंबापरी होण्याच्या भीतीने शिवसेना धास्तावली आहे़ त्यामुळे पाणी तुंबण्यास पालिका प्रशासनाला जबाबदार धरल्यानंतर शिवसेनेने आता मित्रपक्षाला लक्ष्य केले आहे़ पम्पिंग स्टेशनमध्ये गाद्या टाकून पाणी तुंबविण्याचेही प्रयत्न होतील, असा धक्कादायक आरोप करीत, शिवसेना नेत्यांनी चक्क मित्रपक्ष भाजपावरच अविश्वास दाखविला़
यंदाच्या पावसाळ्यात नाले तुंबल्यास पालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला आयते कोलीत मिळेल, या भीतीने शिवसेनेनेची झोप उडाली आहे़ त्यात भाजपाकडून अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे़ त्यामुळे आतापासून बचावात्मक पावित्रा घेत, सत्ताधाऱ्यांनी आपली जबाबदारी ढकलण्यास सुरुवात केली आहे़
पावसाळ्यात संभाव्य तुंबापुरीसाठी प्रशासनाला जबाबदार धरल्यानंतर, शिवसेनेच्या शिलेदारांनी आज पत्रकार परिषद घेऊन मित्रपक्षाकडे बोट दाखविले़ सध्या वातावरण बिघडले असल्याने, शिवसेनेला बदनाम करण्यासाठी पम्पिंग स्टेशनच्या पाइपलाइनमध्ये गाद्या आणि कचरा टाकून पाणी तुंबवू शकतात, असा भाजपावर अप्रत्यक्ष आरोप सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केला़ (प्रतिनिधी)
>पूर्वकल्पना न देता पाहणी दौरे
नालेसफाईच्या कामावर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाला पूर्वकल्पना न देता पाहणी दौरे करण्यात येतील़, जेणेकरून नालेसफाईची सत्य परिस्थिती समोर येईल, असे महापौरांनी सांगितले़, तसेच वेळ पडल्यास शिवसेनेचे शाखाप्रमुख शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवून सफाई करून घेतील, असा बचावही शिवसेनेने सुरू केला आहे़
>...यासाठी सुरू आहे शिवसेनेचा बचाव
गेल्या वर्षी शिवसेनेने नालेसफाईला प्रशस्तिपत्रक दिले होते़ मात्र, पावसाळ्यात नाले तुंबले, याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले़ त्यामुळे निवडणुकीच्या वर्षात सावध भूमिका घेत, शिवसेनेतर्फे महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्त अजय मेहता यांना आज पत्र पाठवून, पाणी तुंबल्यास प्रशासन जबाबदार असल्याचा इशारा दिला आहे़