अतिवृष्टीमुळे चिरनेर गावात पुराचे पाणी
By Admin | Published: September 18, 2016 01:44 AM2016-09-18T01:44:36+5:302016-09-18T01:44:36+5:30
शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नाला ओसडून वाहू लागला.
उरण : शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नाला ओसडून वाहू लागला. गावात उदभवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नाल्या काठावरील अनेक रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले. यावेळी गावातील रहिवाशी हे निद्रावस्थेत असल्याने गावात खळबळ माजली. गावात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
उरण तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिध्द चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होते. यावर शासनाने उपाय योजना करावी तसेच चिरनेर गावातील मध्ये भागातून वाहत जाणाऱ्या नाल्याचे काम शासनाने हाती घ्यावे अशी मागणी वारंवार चिरनेर गावातील ग्रामस्थ करीत आहेत. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे चिरनेर गावातील नाल्याचा प्रश्न पडून राहिल्याने चिरनेर गावातील रहिवाशांना दरवर्षीच्या पावसाळ्यात पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे तसेच आर्थिक नुकसान सहन करावा लागला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री चिरनेर गावातील रहिवाशी गाढ झोपलेले असताना मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नलाा ओसडून वाहू लागला. नाल्याला उद्भवणाऱ्या पुरपरिस्थितीतमुळे चिरनेर गावातील नारायण खारपाटील, वैजंता म्हात्रे, अशोक मोकल सारख्या अनेक रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले यावेळी गावात खळबळ माजली. चिरनेर गावातील ग्रामस्थांनी पुरात अडकलेल्या रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले आहे. त्यामुळे जिवीतहानी टळली असली तरी रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या संदर्भात उरण तालुक्याच्या तहसिलदार कल्पना गोडे यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की उरणता लुक्यात सरासरी पेक्षा १७९ मि. मी. पाऊस पडला आहे. तालुक्यातील गावांचा पुरपरिस्थिती संदर्भात आढावा घेतला जात आहे. ज्या रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यांच्या नुकसानी संदर्भात महसूल विभागाचे कर्मचारी पंचनामे करीत आहेत. तालुक्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतू चिरनेर गावातील ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तशा प्रकारचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी घाबरुन न जाता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार कल्पना गोडे यांनी उरणकराना केले आहे. (प्रतिनिधी)
>शॉक लागून दांपत्याचा मृत्यू
चिरनेर गावात मध्यरात्रीच्या सुमारास उदभवलेल्या पूर परिस्थितीमध्ये गावातील रहिवाशी रामकृष्ण नारंगीकर व त्यांची पत्नी यांचा घरात शिरलेल्या पूराच्या पाण्यात शॉक लागून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. घरात पाणी शिरल्याने लोखंडी जीन्यात विद्युत प्रवाह शिरल्याने विजेच्या धक्क्याने या दुर्दैवी पती - पत्नीच ेनिधन झाले. त्यांचे घर बंद अवस्थेत असल्याने झाला प्रकार उशिराने कळल्याची माहिती उरण तहसिलदार कल्पना गोडे यांनी दिली. दरम्यान रामकृष्ण नारंगीकर व त्यांच्या पत्नीच्या दु:ख निधनाबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.