मागणी नाही म्हणून कोका कोलाला पाणी!
By Admin | Published: July 22, 2016 03:46 AM2016-07-22T03:46:54+5:302016-07-22T03:46:54+5:30
वाडा बंधाऱ्यातील पाण्याला मागणीच नाही, पाणी वाया जाते असे कारण सांगत ते पाणी कोका कोला कंपनीला ३२० रुपयांना दहा हजार लिटर या दराने दिले जात आहे
मुंबई : कोल्हापूरी पध्दतीच्या बंधाऱ्यांचे पाणी फक्त शेतीसाठी वापरावे, असा कायदा असताना वैतरणा नदीवर कुडूस गावाजवळ वाडा बंधाऱ्यातील पाण्याला मागणीच नाही, पाणी वाया जाते असे कारण सांगत ते पाणी कोका कोला कंपनीला ३२० रुपयांना दहा हजार लिटर या दराने दिले जात आहे.
ही माहिती विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात समोर आली. आनंद ठाकूर, हेमंत टकले आदींनी हा प्रश्न विचारला होता. कोका कोला कंपनीकडून फक्त १९ लाख ५० हजार रुपये घेतले गेले. मात्र त्या बदल्यात लाखो लिटर पाणी त्या कंपनीने घेतल्याचेही जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उत्तरातून समोर आले. या कंपनीने स्वत:च्या परिसरात पाण्यासाठी ५०० मिटर खोल बोअर खोदल्याचे समोर आल्यानंतर जर असे बोअर खोदले असतील तर ते बंद केले जातील असे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या जमिनीत पाण्याची पातळी वाढते पण तेथेच कोका कोलाने बोअर टाकल्याचे आक्षेप सदस्यांनी घेतले. (प्रतिनिधी)