मनरेगामधून जलसंधारण, मृदसंधारणासह नवीन २८ कामांना मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 04:18 AM2019-05-12T04:18:52+5:302019-05-12T04:19:04+5:30
राज्यात मनरेगा योजनेतून जलसंधारण, मृदसंधारणासह शाळा कंपाऊंड बांधकामासारखी विविध २८ प्रकारची कामे करण्यास मान्यता देण्यात आली आहेत.
मुंबई : राज्यात मनरेगा योजनेतून जलसंधारण, मृदसंधारणासह शाळा कंपाऊंड बांधकामासारखी विविध २८ प्रकारची कामे करण्यास मान्यता देण्यात आली आहेत. त्यामुळे गावात दुष्काळाच्या काळात मनरेगाची कामे करुन रोजगार निर्मितीबरोबर गावांमध्ये दुष्काळनिवारणासह विविध लोकोपयोगी कामांची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. धुळे, जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील सरपंचांशी त्यांनी आॅडीओ ब्रीज सिस्टीमद्वारे संवाद साधला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भात कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा, पहिले प्राधान्य पिण्याच्या पाण्याला द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गावांच्या लोकसंख्येसाठी २०१८ चा निकष लक्षात घेऊन आवश्यक अतिरिक्त टँकर व जनावरांच्या मागणीनुसार चाऱ्याची उपलब्धता करुन द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. जळगाव जिल्ह्यात टँकरची मागणी केलेल्या टंचाईग्रस्त गावांना तत्काळ दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, तसेच दुष्काळ निवारणासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाला केल्या. बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भात सर्व प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
धुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी निधी तसेच आवश्यक तेथे बोअरवेलची संख्या वाढविण्यात यावी. जिल्ह्णांमध्ये जलसंधारणाची कामे आणि आवश्यकतेनुसार जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.
आचासंहितेचा अडसर नाही
दुष्काळी कामांना आचारसंहिता लागू नाही, निवडणूक आयोगाने दुष्काळी कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाययोजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.