औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय
By Admin | Published: April 26, 2017 01:49 AM2017-04-26T01:49:13+5:302017-04-26T01:49:13+5:30
संपूर्ण राज्यासाठी औरंगाबाद येथे मृद व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असून जलसंधारण विभागाचे नाव बदलून
मुंबई : संपूर्ण राज्यासाठी औरंगाबाद येथे मृद व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असून जलसंधारण विभागाचे नाव बदलून ते आता मृद व जलसंधारण विभाग असे करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत त्यास मान्यता दिली. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेच्या परिसरात हे आयुक्तालय येत्या १ मे पासून सुरु होणार आहे.
गेल्या आॅक्टोबर मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय स्थापन करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या स्थापनेसह जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्याची कार्यवाही करण्यात आली. मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या आयुक्त पदावर भारतीय प्रशासन सेवेतील (अधिकालिक वेतनश्रेणीत) अधिकारी नेमण्यात येणार आहे. जल व भू-व्यवस्थापन ( वाल्मी ) ही जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील प्रशिक्षण संस्था तिच्या स्वायत्ततेला बाधा न आणता मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करुन या विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सरळसेवा पदभरतीसाठी घालण्यात आलेली बंदी मृद व जलसंधारण विभागास लागू ठरणार नाही. तसेच, मृद व जलसंधारण विभागाचे स्वतंत्र सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध होईपर्यंत आकृतिबंधामध्ये मंजूर असलेल्या सर्व पदांसाठी जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, कृषी इत्यादी विभागातील समकक्ष पदांचे सेवाप्रवेश नियम लागू ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)