पाणी : क्रिकेट अन दारूसाठी!

By admin | Published: April 7, 2016 03:13 AM2016-04-07T03:13:25+5:302016-04-07T03:41:08+5:30

राज्याच्या अनेक भागांतील जनता भीषण दुष्काळाने होरपळत असताना उपलब्ध पाणी सर्वप्रथम पिण्यासाठी वापरणे आवश्यक असूनही क्रिकेटचे सामने व मद्यनिर्मिती अशा चैनीसाठी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत

Water: Cricket for Alcohol! | पाणी : क्रिकेट अन दारूसाठी!

पाणी : क्रिकेट अन दारूसाठी!

Next

राज्याच्या अनेक भागांतील जनता भीषण दुष्काळाने होरपळत असताना उपलब्ध पाणी सर्वप्रथम पिण्यासाठी वापरणे आवश्यक असूनही क्रिकेटचे सामने व मद्यनिर्मिती अशा चैनीसाठी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नेमका हाच मुद्दा पकडून उच्च न्यायालयाने ‘माणसे महत्त्वाची की क्रिकेट सामने?‘ असा संतप्त सवाल बुधवारी मुंबईत केला. तर दुसरीकडे तहानलेल्या मराठवाड्यासाठी जायकवाडीत आणल्या जाणाऱ्या पाण्यापैकी बहुतांश पाणी बीअर आणि मद्यनिर्मिती कारखान्यांना पुरविले जात असल्याचे चित्र आहे.
माणसे महत्त्वाची की क्रिकेट?; कोर्टाने झापले
मुंबई :भीषण दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईने महाराष्ट्राच्या अनेक भागांतील जनता होरपळत असताना ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यांच्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी लाखो लीटर पाणी वापरणे हा पाण्याचा ‘गुन्हेगारी अपव्यय’ आहे, असे तिखट बोल उच्च न्यायालयाने क्रिकेट संघटनांना बुधवारी सुनावले. तसेच तुमच्यासाठी माणसे महत्त्वाची की क्रिकेट सामने महत्त्वाचे, असा सवालही न्यायालयाने केला.
राज्यात पाण्याची परिस्थिती एवढी गंभीर असताना हे सामने जेथे पाणी मुबलक आहे अशा अन्य ठिकाणी घेणे अधिक योग्य होईल, अशी सूचनाही न्यायालयाने केली. कार्यकारी अ‍ॅडव्होकेट जनरल रोहित देव यांनी उद्या गुरुवारी हजर राहून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच ‘आयपीएल’ सामन्यांच्या बाबतीत काय अंतरिम आदेश देता येईल हेही गुरुवारीच पाहू, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

 


मॅच फिक्सिंगमुळे वादग्रस्त ठरलेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) स्पर्धेचे नववे सत्र ९ एप्रिल ते २९ मे दरम्यान होणार असून स्पर्धेतील एकूण ६३ सामन्यांपैकी १९ सामने मुंबई, पुणे व नागपूरमध्ये व्हायचे आहेत. या सामन्यांच्या खेळपट्ट्यांसाठी लाखो लीटर पाणी वापरले जाण्याविरुद्ध ‘लोकसत्ता मुव्हमेंट’ या स्वयंसेवी
संघटनेन व केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीत न्या. विद्यासागर कानडे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने वरील मत व्यक्त केले.
सन २०१३ मध्ये मुंबईत वानखेडे, नवी मुंबईत डी. वाय पाटील व पुण्यात सहारा स्टेडियमर झालेल्या सामन्यांच्या वेळी खेळपट्ट्या तयार करण्यासाठी ६६ लाख लिटर पाणी वापरले गेले होते. राज्याच्या दुष्काळी भागांत लोकांना दररोज दरडोई २० लिटर पाणी मिळणेही दुरापास्त असताना आता होऊ घातलेल्या ‘आयपीएल’ सामन्यांच्या खेळपट्ट्यांसाठी ६३ हजार लिटर पाणी वापरले जाणार आहे, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलाने निदर्शनास आणले. एक तर ‘आयपीएल’ सामने राज्यात भरविण्यास मनाई करावी किंवा सामन्यांच्या खेळपट्ट्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक लिटर पाण्यासाठी आयोजकांकडून एक हजार रुपये वसूल करावेत, अशी याचिकाकर्त्यांती मागणी आहे.
‘वानखेडे स्टेडियमसाठी किती लिटर पाणी लागेल?’ असा प्रश्न खंडपीठाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) विचारला. त्यावर एमसीएने मुंबईत आठ सामन्यांसाठी ४० लाख लिटर पाण्याची आवश्यकता असल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर ‘फारच मोठ्या प्रमाणावर तुम्ही पाणी वापरणार आहात?’ असा शेरा खंडपीठाने मारला.
खेळपट्ट्या आणि मैदानावर मारण्यासाठी लागणारे पाणी आम्ही विकत घेत आहोत. टँकरने आणले जाणारे ते पाणी पिण्यायोग्य नाही, असे ‘एमसीआय’च्या वकिलाने सांगितले. मुंबई महापालिकेच्या वकिलाने सांगितले की, पालिका वानखेडे स्टेडियमला फक्त पिण्याचे पाणी पुरविते.
राज्यातील बहुतांश भागात दैनंदिन वापरासाठी पाणी नसल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणली. यावर, पाण्याची टंचाई केवळ मराठवाड्यापुरती मर्यादित नाही. अशीच परिस्थिती मुंबईच्या बाजूलाच असलेल्या ठाण्याचीही आहे,’ असे न्यायमूर्ती म्हणाले.यंदा राज्याची स्थिती इतकी खराब आहे, की राज्य सरकारला पाण्याच्या साठ्याजवळ लोकांनी जाऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करावे लागले. या स्थितीचा अनुभव परभणी आणि लातूर घेत आहे, याकडेही खंडपीठाने लक्ष वेधले. (प्रतिनिधी)


> टंचाईच्या पाण्यात दारूचा महापूर
संजय देशपांडे, औरंगाबाद
दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनता पाण्यासाठी वणवण भटकत असताना टंचाईच्या पाण्यातून दारू गाळली जात असल्याचे चित्र आहे. औरंगाबादेतील बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना अवघ्या १६ रुपयांत एक हजार लीटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असून १२ उद्योग मद्यनिर्मितीसाठी दररोज ४० लाख लीटर पाण्याचा वापर करत आहेत.
जायकवाडी धरणातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) दररोज ५६ दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा करते. गेल्या वर्षी जून महिन्यात उद्योगांसाठी दहा टक्के पाणीकपात करण्यात आली. कपातीपूर्वी दररोज ६३ दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा केला जात होता. सध्या उपसा होत असलेल्या ५६ पैकी ३२ दशलक्ष लीटर पाणी उद्योगांना दिले जाते. उर्वरित २४ दशलक्ष लीटर पाण्यातून वाळूज, रांजणगाव, घाणेगाव, वळदगाव, कुंभेफळ आदी १३ गावांची तहान
भागविली जाते. उद्योगांसाठी १६ ते १९ रुपयांत, तर घरगुती वापरासाठी ६ रुपयांत एक हजार लीटर पाणी उपलब्ध केले जाते. उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या ३२ दशलक्ष लीटर पाण्यापैकी ४ ते ५ दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना केला जातो. औरंगाबादेत असे १२ कारखाने आहेत. बीअरनिर्मिती करणाऱ्या सहा, देशी दारूनिर्मिती करणाऱ्या दोन, तर विदेशी दारूनिर्मिती करणाऱ्या चार कारखान्यांचा यात समावेश आहे.
आॅस्ट्रेलियाच्या एका नामांकित बीअर कंपनीने भारतात उद्योग सुरूकरण्यापूर्वी जायकवाडीच्या पाण्यावर संशोधन केले होते. हे पाणी सिलिकामुक्त आणि शुद्ध असल्याचे तसेच त्यात ‘फरमेन्टेशन’ची प्रक्रिया प्रभावी होते, असे या संशोधनात आढळले होते. त्यानंतर बीअरनिर्मिती उद्योग औरंगाबादलाच पसंती देऊ लागले. अशा प्रकारे देशाची ‘बीअर राजधानी’ अशी ओळख औरंगाबादची बनली आहे.
—————
हे आहेत मद्य, बीअरनिर्मिती उद्योग
वाळूज औद्योगिक वसाहतीतील मिलेनियम बीअर इंडिया लि., फोस्टर इंडिया लि., कार्ल्सबर्ग इंडिया प्रा.लि., लीलासन्स इंडस्ट्रीज, औरंगाबाद ब्रेवरिज आणि स्कोल ब्रेवरिज हे पाच कारखाने बीअरनिर्मिती करतात. चिकलठाण्यातील युनायटेड स्पिरिट, रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज, कोकण अ‍ॅग्रो आणि बीडीए लि. हे कारखाने विदेशी मद्य, तर रॅडिको आणि डेक्कन बॉटलिंग हे कारखाने देशी मद्याची निर्मिती करतात. इंडो-जर्मन ब्रेवरिज या उद्योगाकडून शीतपेयांची निर्मिती केली जाते. तेथेही पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
—————
लातूरचे दोन दिवसांचे पाणी...
मद्यनिर्मितीसाठी दररोज ४० लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात येतो. भीषण पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या लातूर शहराची दररोजची गरज २० लाख लिटर पाण्याची आहे. लातूर शहराची दोन दिवसांची तहान भागवणाऱ्या पाण्याची बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांकडून एकाच दिवसात नासाडी केली जाते, हे विशेष.

Web Title: Water: Cricket for Alcohol!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.