पुणेकरांवर पाण्याचे संकट

By admin | Published: June 27, 2016 12:47 AM2016-06-27T00:47:56+5:302016-06-27T00:47:56+5:30

पुणे व परिसरावर प्रसन्न होण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याची स्थिती आणखीच गंभीर झाली आहे.

Water crisis of Puneites | पुणेकरांवर पाण्याचे संकट

पुणेकरांवर पाण्याचे संकट

Next


पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यातील पाण्याची पातळी वेगाने खालावत असताना, वरूणराजा मात्र पुणे व परिसरावर प्रसन्न होण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याची स्थिती आणखीच गंभीर झाली आहे. याचा आढावा घेण्यासाठी महापौर प्रशांत जगताप यांनी पाटबंधारे विभागाकडून उपलब्ध पाण्याची आकडेवारी मागविली आहे, त्यानंतर मंगळवारी याबाबत बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीमध्ये शहराला एक ऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
महापौर प्रशांत जगताप यांनी दहा दिवसांपूर्वी हवामान विभागाचे संचालक मुख्योपाध्याय यांची भेट घेऊन आगामी काळात मॉन्सूनची स्थिती काय असणार आहे याबाबत चर्चा केली होती. त्यांनी मॉन्सून सक्रिय होण्यास आणखी ७ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात २६ जून उजाडला, तरी पाऊस आला नाही, त्याचबरोबर आणखी २ जुलैपर्यंत पुणे आणि परिसरात मोठा पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शहराला पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. महापौरांनी दहा दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीमध्ये येत्या ३० जूनपर्यंत पावसाची वाट पाहायची, असा निर्णय घेण्यात आला होता; मात्र एकंदरीत पावसाची बिकट परिस्थिती पाहता, आता तातडीने पाणीकपातीमध्ये वाढ करावी लागणार आहे. शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी धरणसाठ्यामध्ये असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या मतानुसार सध्या उपलब्ध असलेले पाणी १५ जुलैपर्यंत पुरू शकणार आहे.
चिंताजनक परिस्थिती : इतर पर्यायांचा शोध घेण्याबाबत चर्चा
मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर, पहिल्या १५-२० दिवसांतील पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरपून जाते. त्यानंतर धरणांमध्ये पाणीसाठा होण्यास सुरुवात होते. पुणे व परिसरात २ जुलै पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यानंतर पुढील २० दिवस कालावधी धरणामध्ये पाणीसाठा होण्याकरिता द्यावा लागणार आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
३५ लाख लोकसंख्येच्या शहराला ‘जर-तर’च्या शक्यतेवर ठेवता येणार नसल्याने तातडीने इतर पर्यायांचा शोध घेण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात
येणार आहे. शहराच्या पाणीकपातीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट करून, पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंड, इंदापूरसाठी पाणी सोडले होते.
धरणक्षेत्रात पावसाची आस
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये पावसाने ओढ दिली असून, त्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे़ गतवर्षी २६ जूनपर्यंत धरण परिसरात १५ ते २० टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे़ रविवारी खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ १़५७ टीएमसी (५़३८ टक्के) पाणीसाठा असून, गतवर्षी याच दिवशी ते ६़८० टीएमसी (२३़३० टक्के) पाणीसाठा होता़ रविवारी दिवसभरात धरणक्षेत्रात पावसाची भुरभूर होती़ टेमघर ५, वरसगाव आणि पानशेतला २ मिमी पावसाची नोंद झाली़ खडकवासला धरण परिसरात पाऊस झाला नाही़
शहरात रविवारी सायंकाळी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या़ पाऊस थांबून थांबून येत होता़ रात्री साडेआठ वाजेपर्यंत वेधशाळेत २़८ मिमी पावसाची नोंद झाली होती़
खडकवासला धरण साखळीमध्ये गतवर्षी जूनमध्ये चांगला पाऊस झाला होता़ त्यानंतर जुलैमध्ये मोठा खंड पडला होता; पण यंदा जूनमध्येच पावसाने दडी मारली असल्याने त्याचा मोठा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे़ गतवर्षी टेमघर धरण परिसरात सर्वाधिक ७३६ मिमी पावसाची नोंद झाली होती़ यंदा मात्र २६ जूनपर्यंत केवळ ९८ मिमी पाऊस झाला आहे़ अशीच परिस्थिती इतर तीनही धरणक्षेत्राची आहे़
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाण्याच्या उपलब्ध साठ्याची आकडेवारी सोमवारी प्राप्त होणार आहे. त्यानुसार मंगळवारी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची बैठक घेण्यात येईल. एकंदरीत पावसाची परिस्थिती पाहता पाणीपुरवठ्याचा फेरआढावा घ्यावा लागणार आहे- प्रशांत जगताप, महापौर

Web Title: Water crisis of Puneites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.