पाणीकपात कायम राहणार
By admin | Published: August 4, 2016 01:13 AM2016-08-04T01:13:57+5:302016-08-04T01:13:57+5:30
पाणीसाठा केवळ १९१ दिवस पुरणार असून, सध्या तरी नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
पिंपरी : पवना धरण आजअखेर ७५ टक्के भरले. आजचा पाणीसाठा केवळ १९१ दिवस पुरणार असून, सध्या तरी नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आणखी काही दिवस पाणीकपात कायम राहणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पवना धरणाचा पाणीसाठा ७५ टक्के झाला आहे. मावळ परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. धरणातील साठा वाढत आहे. पाणीसाठा समाधानकारक असल्याने महापालिकेतील सदस्यांनी पाणीकपात मागे घेऊन नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली होती.
पाणीकपात मागे घेणार का, या विषयी आयुक्तांना विचारले असता, आणखी काही दिवस पाणीकपात करणे शक्य नाही, पाणीसाठा वाढल्यास जलसंपदा विभागाशी चर्चा करून कपात मागे घेण्याविषयी बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे आयुक्तांनी सांगितले. आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘पवना धरणाचा एकूण साठा २७२.११ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामध्ये २४०.९७ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी ३ आॅगस्टला पाणीसाठा ६५.३५ टक्के एवढा होता.
सध्या २५ टक्के कपात पाणीपुरवठ्यात करण्यात आली असून, आजच्या धरणसाठ्यानुसार हा पाणीपुरवठा २६० दिवस म्हणजे २० एप्रिल २०१७ रोजी पर्यंत पुरेल इतका आहे. १५ टक्के पाणीकपात केल्यास २२९ दिवस म्हणजे २० मार्च २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करता येईल. पाणीकपात १० टक्के केल्यास २१२ दिवस म्हणजे ३ मार्च २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करता येईल आणि कपात रद्द केली, तर १९१ दिवस म्हणजे १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होईल. लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.’’ (प्रतिनिधी)