राज्यातील पाणीसंकट दूर होईपर्यंत पाणीप्रश्नावर काम करणार - आमिर
By admin | Published: May 5, 2016 06:38 PM2016-05-05T18:38:36+5:302016-05-05T18:53:10+5:30
राज्यात पाण्याची समस्या फार मोठी आहे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून या प्रश्नावर मात करता येऊ शकते. म्हणून आम्ही पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे.
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. ५ : राज्यात पाण्याची समस्या फार मोठी आहे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून या प्रश्नावर मात करता येऊ शकते. म्हणून आम्ही पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील वरूड, कोरेगाव (सातारा), अंबेजोगाई (बीड) या तीन तालुक्यांतील गावांमध्ये स्पर्धा सुरू केली असून स्पर्धेत सहभागी गावांसाठी ह्यपाणी फाऊंडेशनच्यावतीने एक कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्य टंचाईमुक्त होईपर्यंत पाणीप्रश्नावर सतत काम करीत राहीन, अशी ग्वाही पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमिर खान यांनी दिली.
वरूड तालुक्यातील वाठोडा या गावी गुरूवारी पहाटे ६.३० वाजता आमिर खान यांचे मराठी सिने कलावंतांसह आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी काटोलचे आमदार आशिष देशमुख, आमदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, तहसीलदार भुसारी, पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, वसुधा बोंडे, सरपंच मनोज बाडे, उपसरपंच सरोज उपासे, पंचायत समितीचे माजी सभापती नीलेश मगर्दे, अभिनेत्री रिमा लागू, मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर, सुनील बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमिर खान यांनी वाठोडा गावच्या पाझर तलावात श्रमदान करून तलावातील गाळ काढला. यावेळी वाठोडा गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी मानवी साखळी करून दोन तास श्रमदान केले. आमिर खान पुढे म्हणाले, यावर्षी ३ तालुक्यांत तर पुढील वर्षी ३० तालुक्यांत आणि त्यापुढील वर्षी ३०० तालुक्यांत ही स्पर्धा घेण्यात येईल. राज्य पूर्णपणे टंचाईमुक्त होईपर्यंत आम्ही ही स्पर्धा घेतच राहू. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावात जलसंवर्धनाचे उपक्रम राबविले जाणार असल्याने प्रत्येकच गाव विजेता ठरेल, असेही आमिर खान यावेळी म्हणाले.
सत्यजित भटकळ यांनी 'वॉटर कप' स्पर्धेसाठी वाठोडा ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले व स्पर्धेची माहिती दिली. शास्त्रीयदृष्ट्या पाणी अडविणे, जिरविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक गावातील ५ लोकांना प्रशिक्षण दिले आहे. वरूड तालुक्यात या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनातील अधिकारी नियमितपणे श्रमदान करतात. ही चळवळ निश्चिपणे पाणीप्रश्न संपवेल. यावेळी अभिनेत्री रिमा लागू, सई ताम्हणकर, सुनील बर्वे, आ. अनिल बोंडे यांची देखील भाषणे झालीत. जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले, वाठोडा तालुक्यात ५६ हजार एकर जमीन मशागतीखाली आहे. त्यातील १० हजार एकर जमीन सिंचनाखाली आहे. पुढील तीन वर्षांत या भागात ठिबक करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.