थेंब थेंब पाणी वाचविणारे जलदूत
By admin | Published: June 1, 2016 04:34 AM2016-06-01T04:34:08+5:302016-06-01T04:45:49+5:30
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन तो वाचविण्यासाठी राज्यभरात जलमित्र चळवळ उभी राहिली आहे. पाण्याचा अपव्यय टाळून थेंब न् थेंब पाण्याची बचत करण्यासाठी राज्यातील
मुंबई : पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन तो वाचविण्यासाठी राज्यभरात जलमित्र चळवळ उभी राहिली आहे. पाण्याचा अपव्यय टाळून थेंब न् थेंब पाण्याची बचत करण्यासाठी राज्यातील जलदूतांनी पुढाकार घेतला आहे.
ठाण्यातील ८१ वर्षीय आबीद सुरती यांनी २००७ पासून ड्रॉप डेड फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची मोहीम व जनजागृती सुरू केली आणि त्यांच्या या कार्याची दखल विविध स्तरावर मोठ्या प्रमाणात घेतली जाऊ लागली. ड्रॉप डेड फाउंडेशनच्या माध्यमातून फेब्रुवारी २००७ पासून आबीद यांनी स्वत: मीरा रोड परिसरातील घराघरांत जाऊन गळके नळ विनामूल्य दुरुस्त करून देण्याची मोहीम हाती घेतली.
पहिल्याच वर्षात आबीद यांनी मीरा रोडमधील १ हजार ६६६ घरांना भेटी दिल्या. त्यात ४१४ गळके नळ त्यांनी विनामूल्य दुरुस्त केले. आजही प्रत्येक रविवारी ते सोबत प्लम्बर घेऊन घरोघरी जातात. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी हजारो नळांची दुरुस्ती करून लाखो लिटर पाणी वाचवले आहे. किंगखान शाहरूख खान याने देखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. जलबचतीसाठी व्यापक लोकसहभाग व जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासाठी एक मिनिटाचा लघुपट बनवण्याची स्पर्धा घेतली होती.
आॅस्ट्रेलियात वास्तव्य असलेल्या परंतु सध्या दीड-दोन महिन्यांसाठी जळगावात परतलेल्या सुरेश पाटील यांनी त्यांच्या घराच्या आवारातील बंद असलेल्या कूपनलिकेवर रेनवॉटर हार्वेस्टिंग केले आहे. त्यांच्या घराच्या २५०० चौ.फूट छताचे पाणी या पावसाळ्यात त्या बंद असलेल्या कूपनलिकेत सोडले जाणार आहे.
ठाण्यातील जलमित्र नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिकेच्या निधीची वाट न बघता बायर इंडियाच्या मदतीने आपल्या प्रभागातील चार विहिरींची साफसफाई करून त्यातील पाणी इतर वापरासाठी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे येथील सुमारे २० हजार घरांना पाणीकपातीच्या काळातही या विहिरींतील पाण्याचा वापर होऊ लागला आहे. (प्रतिनिधी)
हायलाईटस्
च्सातारा : जिल्ह्यातील खटाव आणि माण या कायम दुष्काळी तालुक्यांमध्ये शासन तसेच खासगी संस्थांकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पाणी भरण्यासाठी येथे मोठा पाईप असायचा, परंतु तो काढून नळाच्या तोट्या बसविण्यात आल्यामुळे पाणी गळती थांबली.
च्मलकापूर येथे अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानात पाणी मारण्याऐवजी ‘ब्लोअर’ने धूळ साफ करण्यास प्राधान्य दिले आहे.
च्खटाव तालुक्यातील खातगुण ग्रामपंचायतीच्या वतीने शोषखड्डे तयार करण्यात आले असून सांडपाणी येथे सोडण्यात येते.
च्ठाणे : येथील निसर्गप्रेमी संघटनांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या जंगलातील गाळ काढला.
च्सोलापूर : बिगर बझार या शॉपिंग मॉलमध्ये ‘लोकमत बालविकास’ मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बालमित्रांनी पाणीबचतीचा संदेश दिला.