‘पाणी एक्स्प्रेस’ मिरजेतून आज लातूरच्या दिशेने?
By admin | Published: April 11, 2016 03:16 AM2016-04-11T03:16:53+5:302016-04-11T03:16:53+5:30
लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वे टँकर रविवारी मिरजेत पोहोचले. रेल्वेस्थानकातील यंत्रणेमार्फत हे टँकर भरण्यास सुरुवात झाली आहे. पुरेसे टँकर भरल्यास सोमवारीच लातूरला
मिरज : लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वे टँकर रविवारी मिरजेत पोहोचले. रेल्वेस्थानकातील यंत्रणेमार्फत हे टँकर भरण्यास सुरुवात झाली आहे. पुरेसे टँकर भरल्यास सोमवारीच लातूरला ही पाणी एक्स्प्रेस रवाना करण्यात येईल.
राजस्थानच्या कोटा येथून ५० टँकर रविवारी सकाळी मिरजेत आले. टँकर भरण्यासाठी रेल्वे पाणीपुरवठा केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यासाठी चार दिवस लागणार असल्याने रेल्वेस्थानकातील पाणी भरण्याच्या यंत्रणेद्वारे दुपारी दहा टँकर भरण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, पाणी भरण्याची गती अत्यंत कमी असल्याने रात्रीपर्यंत दहा टँकर भरले नव्हते. किमान दहा टँकरमध्ये पाणी भरून सोमवारी ते लातूरला पाठविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारपर्यंत रेल्वे यार्डापर्यंतच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर लातूरला सुरळीत पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी मिरजेत आलेले टँकर स्थानकाबाहेर सायडिंगला लावण्यात आले. मात्र, रेल्वेमंत्री तसेच अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर प्लॅटफॉर्मवरून पाणी भरण्यास परवानगी मिळाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी शनिवारी पाणी भरण्यास नकार दिला होता. (प्रतिनिधी)