पाणी जायकवाडीत जाणारच

By admin | Published: November 4, 2015 02:47 AM2015-11-04T02:47:18+5:302015-11-04T02:47:18+5:30

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील पाच धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयास स्थगिती

Water goes to Jaikwadi | पाणी जायकवाडीत जाणारच

पाणी जायकवाडीत जाणारच

Next

औरंगाबाद : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील पाच धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही मंगळवारी नकार दिला. परिणामी, दोन दिवसांपूर्वी सोडलेले हे पाणी ठरल्याप्रमाणे जायकवाडीत पोहोचणार आहे.
जायकवाडीसाठी पाणी सोडण्याविरुद्ध उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला होता. याच्याविरोधात विरोधात बाळासाहेब घुमरे, संजीवनी (टाकळी) सहकारी साखर कारखाना, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना, गुरुप्रसाद कालवा स्तरीय पाणीपुरवठा व्यापार संस्था आणि हरिश्चंद्र पाणीपुरवठा संस्थांचे सहकारी फेडरेशन यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या. मात्र, सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तू व न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार देऊन त्या निकाली काढल्या.
उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगितीसंबंधी सुनावणीसाठी १७ डिसेंबर ही तारीख दिली होती. त्याऐवजी एक महिना आधी म्हणजे १८ डिसेंबर रोजी सुनावणी घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने १७ आॅक्टोबर रोजी समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीएमसी पाणी मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी-दारणा व पालखेड या धरण समूहातून सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारपासून पाणी सोडणे सुरूही झाले आहे. वरच्या धरणांमधून सोडलेले हे पाणी जायकवाडीपर्यंत विनाअडथळा पोहोचेल व ते फक्त पिण्यासाठीच वापरले जाईल, याची खात्री करण्याचे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयास आधीच दिलेले आहे. त्याचे पालन होईल, याकडे मुख्य सचिवांनी लक्ष द्यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
जायकवाडीत पाणी सोडण्यास स्थगिती मागताना याचिकाकर्त्यांतर्फे कपिल सिब्बल व शेखर नाफडे या ज्येष्ठ वकिलांनी असा युक्तिवाद केला की, जायकवाडी उर्ध्व भागातील धरण समूहातून पाणी सोडल्यास नाशिक व नगर जिल्ह्यांना पिण्यासाठी पाणी राहणार नाही. या भागातील फळबागा उद्ध्वस्त होतील. जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात २६ टीएमसी पाणी आहे व ४.५५ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यामध्ये शिल्लक असल्याने जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची गरज नाही.
याचा प्रतिवाद करताना गोदावरी पाटबंधारे महामंडळातर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणले की, जायकवाडी धरणातील मृत साठ्यातील २६ टीएमसी पाणी हे पिण्यायोग्य नाही व मृतसाठा हा आपत्कालीन परिस्थितीसाठी वापर करावयाचा असतो. सद्यस्थितीला जायकवाडीत केवळ ४.५५ टीएमसी पिण्यायोग्य पाणी आहे. या उलट उर्ध्व भागातील धरणात ६२ टक्के पाणी पातळी तर जायकवाडी व त्याखालील धरण समूहात केवळ १४ टक्के पाणी पातळी आहे. नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांमध्ये ४५ टीएमसीपेक्षा जास्त पाण्याचा साठा आहे.
मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे व त्यामुळे समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही अ‍ॅड. तळेकर यांनी सांगितले.
या प्रकरणात मराठवाडा जनता विकास परिषदेचे परभणी येथील कार्यकर्ते प्रा. अभिजित धानोरकर यांनी अ‍ॅड. अमोल करांडे यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल करून स्थगितीस विरोध केला. (प्रतिनिधी)

आतातरी विरोेध थांबवावा
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातदेखील स्थगिती नाकारलेली असल्यामुळे आतातरी नाशिक व नगरकरांनी पाणी अडविण्याचा नाद सोडून द्यावा, असे आवाहन मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी केले आहे.
यापुढे असा विरोध झाला तर मराठवाडा संघटितरीत्या त्याला चोख उत्तर देईल. त्यासाठीच ७ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली आहे, असेही अ‍ॅड. देशमुख यांनी सांगितले.

कठोर उपायांची हमी
नाशिक व नगर जिल्ह्यांतील पाच धरणांमधून सोडलेले पाणी जायकवाडीपर्यंत नीट पोहोचेल याची खात्री करण्यासाठी कठोर उपाय योजण्याची हमी राज्य सरकारने दिली आहे. त्यानुसार सोडलेल्या पाण्याची गळती होऊ नये व ते वाटेत कोणालाही उपसता येऊ नये यासाठी मार्गातील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांचे दरवाजे बंद केले जातील व भागातील वीजपुरवठाही बंद ठेवला जाईल.

‘मुळा’चे पाणी जायकवाडीत पोहोचले
मुळा धरणातील पाणी मंगळवारी रात्री उशिरा जायकवाडी धरणात पोहोचले. जायकवाडी धरणात ३ हजार १३१ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे, तर भंडारदरा धरणातील पाणी ८० किलोमीटरचे अंतर कापून प्रतापूरमध्ये दाखल झाले असून, प्रवरचे पाणी जायकवाडी धरणात पोहोचण्यास २ दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे़
भंडारदरा-निळवंडे धरणातून प्रवरा नदीत २ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे़ रविवारी
९ वाजता सोडलेले पाणी अद्यापही जायकवाडीत पोहोचले नाही़ निळवंडेच्या पाण्याने
८० किलोमीटरचे अंतर कापले असून, पाणी प्रतापूरमध्ये दाखल झाले आहे़

नवी याचिकाही फेटाळली
नाशिक पंचायत समितीचे सदस्य अनिल ढिकळे यांची नवी याचिकाही कोर्टाने फेटाळली. पिण्यासाठी व वापरासाठी किती पाणी याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने आदेशाला स्थगिती द्यावी, अशी ढिकळे यांची विनंती होती. आधीच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.

भाजपा आमदारांच्या घरांसमोर निदर्शने
नाशिक : जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा मुद्दा पेटला असताना, स्थानिक भाजपा आमदार मात्र मौन बाळगून असल्याने त्यांना जागे करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने शहरातील भाजपाच्या तिन्ही आमदारांच्या निवासस्थानी धडक दिली. आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी केली. सानप मात्र निवासस्थानी नव्हते. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या विदेश दौऱ्यावरून परतल्या नसल्याचे सांगण्यात आले. केवळ फोटोसेशन करून आंदोलनकर्ते आमदार सीमा हिरे यांच्या घराकडे गेले, परंतु सीमा हिरे आणि त्यांचे पती महेश हिरे हे स्वत:हून सामोरे गेले आणि आपण नाशिककरांसोबतच असल्याची ग्वाही दिली. त्यांच्या घरासमोर घंटा वाजल्याच नाहीत.

Web Title: Water goes to Jaikwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.