‘वॉटर ग्रीड’ करेल राज्याचा कायापालट - लोणीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:29 AM2017-07-21T01:29:21+5:302017-07-21T01:29:21+5:30
‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्राची स्वत:ची पाणीपुरवठा योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. पाणीपुरवठा योजना राबविताना एक स्रोत संपला
‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्राची स्वत:ची पाणीपुरवठा योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. पाणीपुरवठा योजना राबविताना एक स्रोत संपला की दुसरा स्रोत अशी शोधाशोध करण्यापेक्षा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाण्याची शाश्वत रचना निर्माण करण्यात येत आहे. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून दुष्काळी भागातही पाणी पोहोचविणे शक्य होणार असून त्यामुळे महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
वॉटर समिट-२०१७च्या माध्यमातून ‘लोकमत समूहा’ने पाणीप्रश्नावर व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे सांगून बबनराव लोणीकर म्हणाले की, दोन वर्षांच्या दुष्काळात सहा हजार टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ राज्यावर आली. त्यानंतर जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यभरातील ११ हजार गावांतील नद्यांचे खोलीकरण, धरणे आणि तळ्यातील गाळ काढणे, नवीन पाण्याचे साठे तयार करणे आदी कामे हाती घेण्यात आली.
आपल्या घराला लागणाऱ्या पाण्याचा विचार प्रत्येक व्यक्ती करते. तसाच विचार राज्याला लागणाऱ्या पाण्याबद्दल व्हायला हवा. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नाचा विचार करून योजना हाती घेतल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून
राज्यातील ११ हजार गावांत सरकारच्या वतीने पाण्याची कामे झाली. लोकसहभागातून निधी
उभारण्यात आला. लोकसहभागातून राबविण्यात आलेली ही
क्रांतिकारक योजना असल्याचे लोणीकर म्हणाले.