झाई आश्रमशाळेत पाणी व्याख्यान
By admin | Published: February 27, 2017 03:12 AM2017-02-27T03:12:58+5:302017-02-27T03:12:58+5:30
झाई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी पिण्याचे शुद्ध पाणी या विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- झाई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी पिण्याचे शुद्ध पाणी या विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डहाणू एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी आचल गोयल या प्रमुख अतिथी होत्या. तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल धूम, शिक्षण विस्तार अधिकारी चाबके, नितीन सावे, सहा. शिक्षण अधिकारी केशव मोहिते आदी. मान्यवरांनी हजेरी लावली.
बोर्डीतील जीवनधारा संजीवनी अॅक्वाफ्रेश ड्रिंकिंग वॉटरचे महादेव सावे यांनी या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत मिनरल वॉटर पुरविणार असल्याची घोषणा केली. तर आँचाल गोयल यांनी थेट विद्यार्थ्यांच्या घोळक्यात बसून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज, कौटुंबिक तसेच अभ्यासविषयी माहिती विचारून हितगूज साधले. त्यानंतर कधी हिंदी, तर कधी मराठी भाषेतील चर्चेत विद्यार्थी रमल्यावर स्वच्छ पाणी व आरोग्याचे महत्व त्यांनी विषद केले. शिवाय दैनंदिन उदाहरणांचे दाखले देत पाणी बचत आणि अपव्यय कसा टाळता येऊ शकतो या विषयी माहिती दिली. स्वच्छ भारत आणि पाणी हे जीवन हे ध्येय उराशी बाळगून स्वच्छता दूत बनण्यासाठी केलेल्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पाण्यातील क्षार व दूषितपणा दाखविण्यासाठी सावे यांनी विजेच्या उपकरणाचा वापर करून प्रात्यक्षिक दाखविले. शिवाय सरबत व खाऊचे वाटप केले. सूत्रसंचालन संतोष अंकारम व दीपक देसले यांनी संपर्कतेने केले.
>‘महादेव सावे या उद्योजकाने विद्यार्थ्यांना मोफत मिनरल वॉटर उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपली आहे’
- आँचल गोयल, डहाणू एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी