जायकवाडीच्या 18 दरवाजांतून सोडले पाणी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 11:51 PM2017-09-21T23:51:28+5:302017-09-21T23:52:30+5:30
जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणात जवळपास १ लाख क्युसेक्सने आवक दाखल होत होती. या परिस्थितीत जायकवाडी धरणाची पाणीपातळी लक्षात घेता गुरुवारी रात्री ११.३० वाजता धरणाचे १८ वक्र दरवाजे अर्धा फूट वर उचलण्यात आले
पैठण, दि. 21 - जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणात जवळपास १ लाख क्युसेक्सने आवक दाखल होत होती. या परिस्थितीत जायकवाडी धरणाची पाणीपातळी लक्षात घेता गुरुवारी रात्री ११.३० वाजता धरणाचे १८ वक्र दरवाजे अर्धा फूट वर उचलण्यात आले असून, धरणातून दहा हजार क्युसेस पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले. दरवाजा क्र. १० ते २७ या दरवाजांतून पाणी सोडण्यात आले. यावेळी जायकवाडीचे कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोडे, तहसीलदार महेश सावंत, जायकवाडी धरण उपअभियंता अशोक चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक गिरी, नगर परिषद मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, आर. ई. चक्रे, माजी नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे, नामदेव खरात, पवन लोहिया, शाम लोहिया, भिकाजी आठवले आदी उपस्थित होते.
जायकवाडी धरणातून यापूर्वी २००८ मध्ये सकाळी ११ वाजता १ लाख क्युसेक्सने पाणी सोडले होते. हे पाणी गोदावरी नदीपात्राबाहेर न गेल्याने कुठलीही हानी झाली नव्हती. परंतु २००६ मध्ये अडीच लाख क्युसेक्सने पाणी सोडले, तेव्हा ७० टक्के पैठण शहर पाण्याखाली गेले होते. शिवाय १५ गावांतही पाणी घुसले होते.