मुळा-पवना नदीच्या संगमावरील पाण्याची पातळी वाढली
By admin | Published: August 4, 2016 01:15 AM2016-08-04T01:15:58+5:302016-08-04T01:15:58+5:30
गेले दोन दिवस शहर परिसरामध्ये पडत असलेल्या पावसामुळे दापोडी येथील मुळा-पवना नदीच्या संगमावरील पाण्याची पातळी वाढलेली आहे.
पिंपरी : गेले दोन दिवस शहर परिसरामध्ये पडत असलेल्या पावसामुळे दापोडी येथील मुळा-पवना नदीच्या संगमावरील पाण्याची पातळी वाढलेली आहे. गेले अनेक दिवस नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी दिवसभरात ५६ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर कायम असल्याने पवना धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. धरणाचा पाणीसाठा ७५ टक्के झाला आहे. फुटांत तो २००३ इतका आहे. ३ आॅगस्टअखेर १४२९ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी या कालावधीत ११६५ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत या वर्षी २६४ मिमी जास्त पाऊस झाला आहे. मागील वर्षी धरणात ६५ टक्के इतका पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत तो १० टक्के जास्त आहे. पाऊस सुरू राहिला, तर अवघ्या ४ ते ५ दिवसांत पवना धरण फुल्ल होऊ शकते. ८० टक्क्यांपेक्षा जादा पाणी साठा झाल्यानंतर धरणातून पाणी विसर्ग सुरू केला जाऊ शकतो. यामुळे पावसाचा अंदाज घेऊन पवना नदी काठाजवळ राहणाऱ्या नागरिकांनी सावधान राहणे गरजेचे आहे, असे पवना शाखा अधिकारी मनोहर खाडे यांनी सांगितले.
शहरवासीयांना अजूनही आणखी काही दिवस एक दिवस आड पाणी मिळणार आहे. त्यामुळे आणखी मोठा पाऊस पडेल आणि शहरातील पाणीटंचाई दूर होईल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. पाणीटंचाईचा आणखी काही दिवस सामना करावा लागणार आहे.