मिरजेचे पाणी रेल्वेने लातूरला
By admin | Published: April 6, 2016 04:59 AM2016-04-06T04:59:18+5:302016-04-06T04:59:18+5:30
लातूर शहरासाठी येत्या १५ दिवसांत मिरजेहून रेल्वेने पाणी आणले जाणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी लातूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
लातूर/मिरज/पुणे : लातूर शहरासाठी येत्या १५ दिवसांत मिरजेहून रेल्वेने पाणी आणले जाणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी लातूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मिरज रेल्वे स्थानकालाही भेट देऊन खडसे यांनी तयारीची माहिती घेतली. लातूरकरांची तहान भागवण्यासाठी मध्य रेल्वे, तसेच राज्य प्रशासनानेही जय्यत तयारी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
लातूरच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आम्हाला पंढरपूरहून रेल्वेने पाणी देण्यास तीन आठवड्यांपूर्वीच मंजुरी दिली आहे, परंतु तिथून पाण्याचा होणारा अपव्यय परवडणारा नसल्याने मिरजेची निवड करण्यात आली आहे. मिरज - लातूर रेल्वेट्रॅक आहे. महसूल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हीच बाब सोयीची असल्याचे लक्षात आले आहे. लातूर रेल्वे स्थानकात पाणी आल्यानंतर ते विहिरीत सोडणे आणि तिथून हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेणे, अथवा त्याचे वाटप करण्यासंबंधीच्या योजना याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वारणा धरणात पुरेसा पाणीसाठा असून, पुढील सहा महिने पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याने, लातूरला पाणी देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.
रेल्वेची तयारी पूर्ण
पाणी वाहतूक करण्यासाठी इंधन टँकरचाच वापर करण्यात येणार असून, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून त्यासंबंधी प्राथमिक आराखडा तयार केला आहे. हे पाणी घेण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथून ५० टँकर असलेला रेक (पाण्याचे टँकर असलेली रेल्वेगाडी) तयार करण्यात येत असून, त्यातील २५ टँकरच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे, तर आणखी २५ टँकरच्या स्वच्छतेचे काम ९ एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वेच्या पुणे कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)