खुलताबादला पाणी पेटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:37 AM2018-04-22T01:37:58+5:302018-04-22T01:37:58+5:30
आंदोलकांची दगडफेक; आठ जणांना अटक, १०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल
खुलताबाद (जि. औरंगाबाद) : शहराला १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने संतापलेल्या खुलताबादकरांनी शनिवारी सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर केलेल्या रास्ता रोको आंदोलनास हिंसक वळण लागले. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत एस.टी. बस व पोलीस व्हॅनच्या काचा फोडल्या.
पोलिसांनी १०० आंदोलकांवर गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली. गिरिजा मध्यम प्रकल्प व इतर प्रकल्प कोरडेठाक पडल्याने शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने मंजूर केलेले सात टँकरही पुरेसा पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरल्याने लोक संतापले आहेत.
खुलताबादमध्ये चार महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. गेल्या महिन्यात पाण्यासाठी नगरपालिका कार्यालयासमोर काहींनी उपोषण केले होते. तेव्हा दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन मिळाले होते. शनिवारी प्रशासनाच्या वतीने कुणीही निवेदन स्वीकारण्यास लवकर न आल्याने आंदोलक आक्रमक झाले. आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने पोलिसांनी धरपकड करताच दगडफेक सुरू झाली.