बाराबंगला वसाहतीत पाण्याची बोंब
By admin | Published: July 13, 2017 04:24 AM2017-07-13T04:24:28+5:302017-07-13T04:24:28+5:30
शासकीय वसाहतींच्या आवारात राहणाऱ्या व अधिकाऱ्यांच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यासारख्या बड्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या बाराबंगला परिसरातील शासकीय वसाहतींच्या आवारात राहणाऱ्या व अधिकाऱ्यांच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाण्याची नवी जोडणी हवी असेल, तर या गोरगरिबांकडे बांधकाम विभागाचे कर्मचारी आठ ते दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत आहेत.
ठाणे पूर्व येथील बाराबंगल्यातील शासकीय वसाहतीमधील ‘इंद्रायणी’ बंगल्याच्या आवारात असलेल्या शासकीय वसाहतीत राहणारा नोकरवर्ग गेला एक महिना पाण्यासाठी वणवण फिरत आहे. तातडीने पाणी हवे असल्यास पाइपलाइनसाठी आठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्याने येथील रहिवाशांना सांगितले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बारा बंगला या शासकीय वसाहतीच्या आऊट हाऊसमध्ये २५ ते ३० वर्षांपासून हे रहिवासी या वसाहतीत वास्तव्य करीत आहे. कधी पाण्याच्या, कधी झाड कोसळण्याच्या, तर कधी छप्पर गळण्याच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. तक्रार केल्यास नोकरीवर गंडांतर येण्याच्या भीतीने काही गप्प बसतात.
‘इंद्रायणी’ बंगल्याच्या आवारात २५ वर्षांहून अधिक काळ चार कुटुंबे राहतात. एक महिन्यापासून त्यांच्या घरात पाणी नाही. इथूनतिथून जाऊन पाणी आणावे लागते. पाणी भरूनभरून हाडे दुखायला लागली आहेत, असे या महिलांनी सांगितले. पाणी भरताभरता तर एका रहिवाशाला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, काही बंगल्यांतील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी दाबाने तेही केवळ अर्धा तासच पाणी येत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. याबाबत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एम. गांगुर्डे यांनी सांगितले की, मी स्वत: बाराबंगल्यात राहतो. पाण्याची कोणतीही समस्या तेथे नाही. पाण्यासंदर्भात कोणत्याही तक्रारी माझ्याकडे तरी आलेल्या नाहीत. संबंधित कर्मचाऱ्याने पाण्याच्या व्यवस्थेसाठी ‘इंद्रायणी’ बंगल्यातील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांकडून पैसे मागितले असल्याबाबत त्यांना विचारणा केली असता मी याविषयी माहिती घेऊन बोलतो, असे सांगितले.
>शासकीय बंगल्यांच्या आवारातच अव्यवस्था
शासकीय निवासस्थान म्हणून बाराबंगला परिसर ओळखला जातो. येथे अनेक शासकीय अधिकारी राहतात. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था बंगल्याच्या आवारातच करण्यात आलेली आहे. येथील बंगल्यात मुबलक पाणीपुरवठा होत असताना या कर्मचाऱ्यांच्या जीर्ण वसाहतींमध्ये पाण्याची बोंब आहे. याचबरोबर २५ ते ३० वर्षांपासून हे रहिवासी या वसाहतीत वास्तव्य करीत आहे. कधी पाण्याच्या, कधी झाड कोसळण्याच्या, तर कधी छप्पर गळण्याच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.