पाण्याला ऐवजाचे मोल!
By Admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:32+5:302016-04-03T03:51:32+5:30
चोरी होऊ नये, म्हणून मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवतात. तशीच काहीशी स्थिती लातूर शहरातील पाण्याची आहे. तीव्र टंचाईतही ज्यांना टाक्या पाण्याने भरून
- हणमंत गायकवाड, लातूर
चोरी होऊ नये, म्हणून मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवतात. तशीच काहीशी स्थिती लातूर शहरातील पाण्याची आहे. तीव्र टंचाईतही ज्यांना टाक्या पाण्याने भरून ठेवता आल्या आहेत, त्यांनी हा ऐवज कुलूपबंद करून सुरक्षित ठेवला आहे. गल्ल्या-गल्ल्यांमधून अशा कुलूपबंद पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत असताना, दीडशे रुपये प्रति महिना पाणीपट्टी आकारली जात होती. आता दिवसाला एका कुटुंबाला पाण्यावर इतका खर्च करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. शिवाय, विकत घेऊन साठवून ठेवलेल्या पाण्याची चोरी झाल्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलपे लावली आहेत.
शहरातील बसवंतपूर, प्रकाशनगर, खाडगाव रोड, संभाजीनगर, गांधीनगर, बौद्धनगर, संत गोरोबा सोसायटी, सिद्धार्थ सोसायटी, क्वाइल नगर, विक्रमनगर, नृसिंहनगर, आवंतीनगर, कपिलनगर, विकासनगर या वसाहतींतून फिरताना कुलूपबंद टाक्या पाहायला मिळतात.
गांधीनगर येथील धनराज शिंदे यांनी सांगितले की, ‘मनपाकडून आठ-दहा दिवसाला दोनशे लीटर्स पाणी दिले जाते, परंतु एवढ्यावर भागत नाही. त्यामुळे आम्ही पाणी विकत घेतो. त्यातच विकतच्या पाण्याचीच चोरी झाली. मध्यरात्री, तसेच दुपारच्या वेळी पाणी चोरीला गेले. त्यामुळे आम्ही टाकीला कुलूप लावतो.’
टँकरधारकांकडे पाण्याची मागणी वाढली आहे, त्यामुळे दरही वाढले आहेत. ज्या संस्था-संघटनांकडून पाणी मोफत दिले जाते, ते त्यांच्या नातेवाईक व कार्यकर्त्यांनाच मिळते. सामान्य व मध्यमवर्गीयांना त्याचा लाभ होत नाही. परिणामी, आम्ही पाणी विकत घेऊन कुलूपबंद ठेवतो, असे कपिलनगर येथील सतीश कांबळे यांनी सांगितले.
टाक्यांना कुलूप...
पाण्याच्या खर्चामूळे नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. शिवाय, विकत घेऊन साठवून ठेवलेल्या पाण्याची चोरी झाल्याचे प्रकारही वाढले आहेत. याची खबरदारी म्हणून लातूर शहरातील सिद्धार्थ सोसायटी, बौद्धनगर, संत गोरोबाकाका सोसायटी, क्वाइलनगर, गांधीनगर येथील अनेकांनी पाणी भरलेल्या आपल्या सिन्टेक्सच्या टाक्यांना कुलूप लावले आहे.
चोरी होऊ नये म्हणून घेतली खबरदारी...
बसवंतपूर येथील जमाल पठाण, सिद्धार्थ सोसायटीतील नीलूबाई सावळे, बौद्ध नगरातील केरबा सूर्यवंशी, संत गोरोबाकाका सोसायटीतील श्रीकांत शिंदे, विनायक कसबे, योगेंद्र कांबळे, क्वाइलनगर येथील सतीश सरवदे, आनंद कांबळे आदींनी आपल्या पाण्याच्या टाकीला कुलूप लावले आहे. घरातल्याही लोकांकडून पाण्याचा गैरवापर होऊ नये अन् चोरीही होऊ नये, यासाठी कुलूप लावल्याचे त्यांनी सांगितले.
वापरासाठी आणि पिण्यासाठी वेगळे...
विकतचे पाणी पिण्यासाठी शुद्ध असेल याची खात्री नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश मध्यमवर्गीय नागरिक पिण्यासाठी जारच्या पाण्याचा वापर करतात, तर वापरण्यासाठी टँकरचे पाणी विकत घेतात. दिवसाला किमान दीडशे रुपये या पाण्यासाठी मोजावे लागत आहेत. त्यामुळे पाण्याचे महत्त्व कळले असून, वापर काटकसरीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी साठविलेले पाणी देखरेखीखाली ठेवले आहे.