खारघर शहरात पाण्याची समस्या

By Admin | Published: April 6, 2017 02:39 AM2017-04-06T02:39:06+5:302017-04-06T02:39:06+5:30

खारघर शहरात मागील महिन्याभरापासून तीव्र पाण्याची समस्या उद्भवली आहे.

Water problem in Kharghar city | खारघर शहरात पाण्याची समस्या

खारघर शहरात पाण्याची समस्या

googlenewsNext

पनवेल : खारघर शहरात मागील महिन्याभरापासून तीव्र पाण्याची समस्या उद्भवली आहे. शहराला ७० ते ७५ एमएलडी पाण्याची गरज असताना सिडकोमार्फत केवळ ५० एमएलडी पाण्यावर बोळवण केली जाते. सातत्याने पाठपुरावा करूनसुध्दा ही समस्या जैसे थेच असल्याने खारघरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी खारघर शहरातून जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून खारघर शहराला स्वत:च पाणी सोडले. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच सिडको अधिकाऱ्यांनी तातडीने हा पाणीपुरवठा बंद केला.
खारघर शहरात सर्वच वसाहतीत पाण्याची समस्या गंभीर होत असताना सिडको प्रशासन कोणतीच भूमिका घेत नाही. विशेष म्हणजे सिडकोने महानगर पालिकेला जलवाहिन्या टाकण्यासाठी जागा देताना करार केला आहे क ी, जेव्हा सिडको विभागात पाण्याची गरज भासेल तेव्हा आम्ही सिडकोच्या संबंधित विभागाला पाणीपुरवठा करू. मात्र, हा करार केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केला. खारघर शहरातून जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून खारघर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभात पाणी सोडले. विशेष म्हणजे अनेक वर्षे होऊन देखील या ठिकाणाहून खारघर शहराला पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. या जलवाहिनीवर असलेला व्हॉल्व सुरू करून या कार्यकर्त्यांनी माघार घेतली. विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन करून भाजपा कार्यकर्त्यांनी प्रशासनाला ठेंगा दाखविला आहे. या कार्यकर्त्यांमध्ये भाजपा जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, समीर कदम, कीर्ती नवघरे तसेच विजय पाटील यांचा समावेश होता.
खारघर शहरात पाण्याची समस्या गंभीर आहे. नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या समस्यांचा परिणाम कुटुंबाच्या बजेटवरच होत असल्याने खारघरमधील रहिवाशांसाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
आमच्यावर प्रशासनाने कारवाई केली तरी चालेल असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. या प्रकारासंदर्भात नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जसवंत मिस्त्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे येत्या काळात खारघर परिसरातील पाणीप्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Water problem in Kharghar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.