दिव्यातील रहिवाशांना तो पुरवतोय पाणी
By admin | Published: May 19, 2016 03:40 AM2016-05-19T03:40:53+5:302016-05-19T03:40:53+5:30
सध्या ठाणे जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात सोसाव्या लागत आहेत.
अजित मांडके,
ठाणे- सध्या ठाणे जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात सोसाव्या लागत आहेत. ठाण्यापेक्षा कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील रहिवाशांना अधिक फटका बसतो आहे. कपातीच्या काळात येथील रहिवाशांना पाणी मिळावे म्हणून दिव्यातील जलमित्र निलेश पाटील याने पुढाकार घेतला असून साबे गावात कोरड्या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकून सुमारे ३०० कुटुंबांना मोफत पाणी उपलब्ध करुन देण्याचे मोलाचे कार्य सुरु केले आहे.
ठाणे शहराला आठवड्यातून दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. तर कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात तीन दिवस पाणीकपात आहे. मात्र, त्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे रहिवाशांना काटकसरीने पाणी वापरावे लागते. तर दिव्यातील अनेक भागांना आजही रेल्वे लाईन क्रॉस करुन पाणी आणावे लागते. विहिरीदेखील कोरड्या झाल्याने रहिवाशांचे हाल होतात. त्यामुळे पाण्याची बचत करण्याचा सल्ला निलेश पाटील हे देत आहेत. येथील गावांना पाणीकपातीच्या काळात पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांनी स्वखर्चातून महिनाभरापासून कोरड्या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकण्यास सुरुवात केली आहे. बुधवार आणि शुक्रवारी टँकरद्वारे पाणी विहिरीत टाकण्याचे काम ते करतात. आतापर्यंत सुमारे १ लाख लीटर पाणी त्यांनी रहिवाशांना उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे ते साबे गावाचे जलमित्रच ठरले आहेत. समाजसेवेचा हा वसा त्यांनी वडिलांकडून घेतला असून, तो आजही सुरुच ठेवला आहे.