मच्छीमार नौकांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

By admin | Published: May 16, 2016 04:37 AM2016-05-16T04:37:23+5:302016-05-16T04:37:23+5:30

पाण्याचा भीषण दुष्काळ आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत केलेली पाणीकपात यांच्या कातरीत मुंबईतील मच्छीमार समाज सापडला आहे.

Water purification project for fishermen boats | मच्छीमार नौकांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

मच्छीमार नौकांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

Next

मनोहर कुंभेजकर,  

मुंबई-राज्यात असलेला पाण्याचा भीषण दुष्काळ आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत केलेली पाणीकपात यांच्या कातरीत मुंबईतील मच्छीमार समाज सापडला आहे. त्यामुळे खोल समुद्रात जाणाऱ्या मच्छीमार नौकांना पाणीपुरवठा करणे ही मच्छीमारांची मोठी समस्या बनली आहे. यावर मात करत वेसावे कोळीवाड्यातील बाजार गल्ली कोळी जमात संस्थेच्या सुमारे ४५० सभासदांनी एकमताने निर्णय घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जपत नाममात्र दरात वेसावे समुद्रकिनारी वेसावकरांना आधारवड ठरणारा आणि राज्यातील समुद्रकिनारी असलेला पहिलाच जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे. रोज २४ तास हा जलशुद्धप्रकल्प सुरू असतो आणि येथील मच्छीमार बांधवांनादेखील यामुळे रोजगार मिळाला आहे. येथील मच्छीमार नौकांसाठी गरजेनुसार या प्रकल्पातून शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
या प्रकल्पातून शुद्धीकरण केलेले पाणी थेट समुद्रकिनारी शाकारलेल्या मच्छीमार नौकांच्या पाण्याच्या कॅनमध्ये भरल्यामुळे मच्छीमारांची दमछाक थांबली आहे. मासेमारीसाठी जाणाऱ्या २० ते २२ मच्छीमार नौकांना या प्रकल्पाचा लाभ होत आहे.
समुद्रकिनारी बाजारगल्लीजवळ १५ बाय १२च्या केबिनमध्ये सुमारे २० फुटी एक कूपनलिका बांधण्यात आली आहे. त्यामधून अद्ययावत जलशुद्धीकरण यंत्राद्वारे एका तासाला सुमारे ४५०० हजार लीटर पाणी तयार होते. येथील ५ हजार लीटरच्या टाक्यांमध्ये हे पाणी साठवले जाते. त्यामध्ये शुद्ध पाण्याचे प्रमाण सुमारे ३००० लीटर इतके असते. टाकाऊ पाणी येथील समुद्रकिनाऱ्यावरील सध्या सुरू असलेल्या मत्स्यविभागाच्या चौथऱ्याच्या कामासाठी व अन्य बांधकामासाठी वापरले जाते. मढच्या मच्छीमार नौकादेखील येथील शुद्ध पाण्याचा लाभ घेतात. तर येथील गरजू नागरिकांना वापरण्यासाठी आणि लग्नसराईसाठी सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो, अशी माहिती बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष पराग भावे यांनी दिली. पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि येथील स्थानिक नगरसेवक यशोधर (शैलेश) फणसे यांचे सहकार्य मिळाल्याचे भावे यांनी सांगितले.

Web Title: Water purification project for fishermen boats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.