वॉटर रिसायकलिंग हाच मार्ग !

By Admin | Published: September 19, 2015 09:15 PM2015-09-19T21:15:20+5:302015-09-19T21:15:20+5:30

पाणी उपलब्ध असताना त्याचा उपयोग, साठवण, वितरण आणि पुनर्वापर यासंदर्भातील गणित चुकत असल्यामुळेच अनेक शहरांमध्ये आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़

Water Recycling Way! | वॉटर रिसायकलिंग हाच मार्ग !

वॉटर रिसायकलिंग हाच मार्ग !

googlenewsNext

- सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांचे मत

पाणी उपलब्ध असताना त्याचा उपयोग, साठवण, वितरण आणि पुनर्वापर यासंदर्भातील गणित चुकत असल्यामुळेच अनेक शहरांमध्ये आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ नेमक्या याच अडचणीच्या परिस्थितीचा आपण योग्य उपयोग करून पिण्याचे पाणी आणि वापरलेले पाणी यासंदर्भात गांभीर्याने आणि शास्त्रशुद्ध पध्दतीने नियोजन करण्याची वेळ आली आहे़ तेच भान ठेऊन सोलापूर जिल्ह्यात पिण्याच्याच नव्हे, तर एकूणच पाणी नियोजन व व्यवस्थापनासंदर्भात क्रांतिकारी पावले आम्ही टाकली आहेत़ ‘रिसायकलिंग आॅफ वॉटर’ हा मुख्य धागा पकडून केलेल्या कामांमुळे येत्या काही दिवसांत या आघाडीवर सोलापूर एक ‘मॉडेल’ म्हणून पुढे येईल, असा विश्वास सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़
राज्यातील अनेक शहरांवर बेतलेल्या पाणीकपात संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंढे यांच्याशी पाणी व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रयोगांसदर्भात बातचीत केली़
राज्यातील अनेक शहरे पाणीकपातीचा फटके सोसत आहेत, मग नेमकं काय आणि कुणाचं चुकतय ?
हे पाहा, शहरीकरणाचा वेग आपण रोखू शकत नाही़ पण उपलब्ध पाण्याचे नियोजन मात्र निश्चितच करू शकतो़ इस्त्राईलसारख्या देशात अत्यल्प पाऊस असूनही तेथे का नाही पाणीटंचाई ? वापरलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे रिसायकलिंग केलेच पाहिजे, हे त्यांनी कृतीत आणले आहे़ आपल्यालाही ते शक्य आहे़ पाणीचोरी, पाणी वितरणातील त्रुटी, पाणीगळती यासारख्या समस्यांवर ठोस उपाय करून जलसंवर्धन व जलवापर यासंदर्भातील कायद्यांचे प्रबोधन केल्यास पाणीटंचाईचे संकटच येणार नाही़ त्यामुळे काय आणि कुणाचे चुकते यापेक्षा प्रत्येकानेच पाणी या विषयाला गांभीर्याने घेऊन कृती करणे गरजेचे आहे़
उजनी धरण १०० टक्के भरले तरी आणि धरण उणे साठ्यात आले तरी सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणी का मिळते ?
मी तेच सांगत होतो! पाण्याची आपल्याकडे उपलब्धता आहे; पण त्याचा वापर आणि नियोजनावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे़ सोलापूर शहराला दोन टीएमसी पाणी देण्यासाठी आम्ही उजनीतील २० टीएमसी पाणी वापरतो़ हेच टाळण्याचे काम मी करतो आहे़ त्यासाठी शहरालगत उभ्या राहत असलेल्या एनटीपीसी प्रकल्पासाठी दररोज १५० एमएलडी पाणी दोन पाइपलाइनद्वारे उजनीतून दिले जाणार आहे़ त्यापैकी एका पाइपलाइनमधून ७५ एमएलडी पाणी शहरासाठी घेणे आणि शहरात वापरलेले जवळजवळ १०० एमएलडी पाणी प्रक्रिया करून एनटीपीसीला देणे़, ज्याद्वारे त्यांचीही गरज भागेल आणि शहरालाही खात्रीचे पाणी मिळेल़ शासन त्यासाठी हवे ते सहकार्य करीत आहे़ त्याला महापालिकेने तातडीने प्रतिसाद दिल्यास डिसेंबरअखेर हे काम पूर्ण होईल़
तरीही उजनीसारखे ११७ टीएमसी एवढ्या विशाल पाणीसाठ्याचे धरण जिल्ह्यात असताना नियोजन का कोलमडते ?
पाणीगळती, पाण्याचा योग्य वापर न होणे आणि नियोजनात कृतिशील सातत्य नसणे या मूळ कारणांमुळे राज्यातील सर्वच धरणांच्या पाण्यासंदर्भात या अडचणी निर्माण झाल्या आहेत़ मुख्यमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्याने धन्यवाद दिले पाहिजेत. कारण या कारणांवर मात करण्यासाठी ज्या ज्या बाबी शासनाने कराव्या लागतात त्या त्यांनी केल्या आहेत़ मी आधी उल्लेख केलेल्या एनटीपीसी पाइपलाइन संदर्भातील शासकीय प्रक्रियांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंजुरी दिली़ आता आम्ही त्या दिशेने कृती करीत आहोत़ त्याला सर्वांची साथ मिळाली तर हा प्रकल्प राज्यात ‘मॉडेल’ म्हणून नावारूपास येईल़ याच प्रकल्पाच्या धर्तीवर इतरही शहरांचे पिण्याच्या पाण्याचे नियोजन होऊ शकेल़

सोलापूर देशात ठरेल मॉडेल !
सोलापुरात होणाऱ्या एनटीपीसी प्रकल्पासाठी उजनीतून १५० एमएलडी पाणी उचलेले जाणार आहे़ दोन जलवाहिन्यांतून हे पाणी घेतले जाणार आहे़ दोन्ही पाइपालइनचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे़ यातील एक जलवाहिनी महापालिकेसाठी पिण्यासाठी घेण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे़ १ नोव्हेंबरपर्यंत याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होईल़ तेवढेच (७५ एमएलडी) पाणी प्रक्रिया करून एनटीपीसीला दिले जाणार आहे़ ही योजना यशस्वी झाल्यास हे देशात मॉडेल ठरेल़

२४ तास पाणी देता येईल
सोलापूर शहरास उपलब्ध पाण्यात २४ तास पाणी देता येऊ शकते़ पाणी आहे, मात्र त्याचे नियोजन नाही़ सुुरुवातीला थोडाफार खर्च होईल; मात्र २४ तास पाणी मिळाल्यास देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाचतो हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे़

मुलाखत - राजा माने
(सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत.)

Web Title: Water Recycling Way!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.