गावक-यांनी स्वनिधीतून साकारली जलसमृद्धी!
By Admin | Published: September 13, 2016 03:01 PM2016-09-13T15:01:28+5:302016-09-13T15:01:28+5:30
जिल्ह्यातील शेलुबाजार (ता. मंगरूळपीर) येथून वाहणा-या अडाण नदीचे लोकसहभागातून खोलीकरण व गाळ उपसा करण्यात आला. यामुळे कधीकाळी भीषण पाणीटंचाईने होरपळणा-या या गावात अक्षरश: जलसमृद्धी झाली.
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १३ - जिल्ह्यातील शेलुबाजार (ता. मंगरूळपीर) येथून वाहणा-या अडाण नदीचे लोकसहभागातून खोलीकरण व गाळ उपसा करण्यात आला. यामुळे कधीकाळी भीषण पाणीटंचाईने होरपळणा-या या गावात अक्षरश: जलसमृद्धी झाली असून पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे.
शेलुबाजार या गावाच्या एका बाजूने वाहणा-या अडाण नदीच्या खोलीकारणाचा विषय उन्हाळ्यात ऐरणीवर आला. नदीपात्रात नियमित गाळ जमा होऊन तिचे पात्र उथळ बनले होते. त्यामुळे पावसाळ्यात ओसंडून वाहणाºया नदीच्या पाण्यामुळे अनेकवेळा परिसरातील २५० हेक्टर जमिनीवरील पिकांना कायमचा धोका लागून होता. विशेष गंभीर बाब म्हणजे नदीचे पाणी थांबत नव्हते. यामुळे ही नदी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातच कोरडी पडत होती. त्यामुळे नदीकाठी वसलेल्या गावांना दरवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत असे. त्यावर मात करण्यासाठी अडाण नदीच्या पत्रातील गाळ उपसणे हा पर्याय समोर आला. वारंवार पाणीटंचाईचा सामना करणा-या गावक-यांनी अधिक विलंब न लावता एकत्रित येऊन लोकसहभागातून नदीमधील गाळ उपसण्याचा निर्धार केला. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार १००० ते ११०० रुपये वर्गणी गोळा केली. यामधून सुमारे १३ लक्ष रुपये गोळा झाले. याआधारे ४०० मीटर लांब पात्रामधील गाळ उपसून त्याची रुंदी ३५ मीटरपर्यंत; तर खोली ३ मीटर करण्यात आली. पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीपात्रात पाणी साठायला लागले. यासह परिसरातील इतर जलस्त्रोतही पाण्याने तुडूंब झाले आहेत.
‘सीएसआर’मधून मिळाले १९ लक्ष
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या कामाची पाहणी करून तातडीने ‘सीएसआर’ फंडातून १९ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून ८०० मीटर लांब नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले.