पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई, नऊ मोठ्या प्रकल्पांत केवळ १५.९० टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 08:17 PM2019-05-18T20:17:22+5:302019-05-18T20:17:27+5:30
पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
अमरावती - पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अमरावती शहरालाही एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने आता जलसंपदा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला किमान एक महिना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पांत १६.१५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात २४.७९ टक्के, अरुणावती प्रकल्पात ११.२८ टक्के, बेंबळा प्रकल्पात २१.०६ टक्के, तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १३.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वान प्रकल्पात सर्वाधिक ३४.०६ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणीसाठ्याची स्थिती भीषण असून, नळगंगा प्रकल्पात फक्त ८.०९ टक्के, तर पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या पाणीसाठा साप्ताहिक अहवालात नमूद आहे. नऊ प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा १५१८.६४ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा फक्त २४१.४४ दलघमी शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यांचीही हीच स्थिती आहे.
२४ मध्यम प्रकल्पांत १८.२१ टक्के पाणीसाठा
पश्चिम विदर्भातील मध्यम प्रकल्पांचीसुद्धा यंदा बिकट स्थिती आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी १८.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहेत. अमरावती जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ३५.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पांत २२.०७ टक्के, अकोला जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ४.९१ टक्के, वाशिम जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांत ८.१३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत ९.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.