विदर्भावर जलसंकट; अमरावती, नागपूर विभागात फक्त 18% पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 05:35 PM2018-04-23T17:35:07+5:302018-04-23T17:35:07+5:30
राज्यात सध्या ३३.६० टक्के जलसाठा
अमरावती : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील प्रकल्पांतील जलसाठा ३३.६० टक्क्यांवर स्थिरावला आहे. त्यात अमरावती व नागपूर विभागातील प्रकल्पांच्या जलसाठ्यानं तळ गाठला आहे. अन्य विभागांच्या तुलनेत विदर्भावरील जलसंकट गडद झालंय. त्यामुळे विदर्भात पाणीबाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
२३ एप्रिलच्या नोंदीनुसार राज्यातील ३२४६ जलप्रकल्पांमध्ये ३३.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी तो २६.८६ टक्के इतका होता. अमरावती विभागातील ४४३ प्रकल्पांमध्ये १९.३५ टक्के, नागपूर विभागातील ३८५ प्रकल्पांमध्ये १७.४४ टक्के, कोकणातील १७५ प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ५०.७१ टक्के, नाशिक विभागातील ५६१ प्रकल्पांमध्ये ३५.७४ टक्के, पुणे विभागातील ७२५ प्रकल्पांमध्ये ३८.९० टक्के आणि मराठवाडा विभागातील ९५७ प्रकल्पांमध्ये ३१.१७ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती व नागपूर विभागातील प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असल्यानं व तप्त उन्हानं मृत साठ्यात वाढ होत असल्यानं विदर्भातील जलसंकटात भर पडणार आहे.
अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये १५.८३ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ३७.२८, तर ४९ लघु प्रकल्पांमध्ये केवळ २०.२० टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये १६.८६ टक्के, ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये २०.८१ टक्के, तर ३२६ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १७.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील सर्वाधिक मोठ्या गोसे खुर्द प्रकल्पात अवघा ६.४३ टक्के, तर अमरावतीच्या काटेपूर्णात ८.१० टक्के, अप्पर वर्धा ४०.६५ टक्के, खडकपूर्णा शून्य टक्के, नळगंगा १५.८२ टक्के, पेनटाकळी ११.२६ टक्के, अरुणावती ७.१०, तर इसापूर १.७१ टक्के, पूस १४.५७ टक्के, बेंबळा १३.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे.
६७१ टँकरनं पाणीपुरवठा
राज्यातील ६७१ गावे व २४७ वाड्यांमध्ये ६७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक ३९६ टँकरने मराठवाडा विभागात पाणी पुरवलं जात आहे. कोकणात ४८, नाशिक विभागात ८५, पुण्यात ०४, अमरावतीमध्ये १३७ टँकर चालवले जात आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये ४९३ टँकरनं पाणीपुरवठा केला जात होता. यंदा त्यात १७८ नं वाढ झाली आहे.