किनारपट्टीवर पाणीटंचाई
By admin | Published: May 2, 2016 12:46 AM2016-05-02T00:46:57+5:302016-05-02T00:46:57+5:30
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर यंदाच्या वर्षी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दुष्काळजन्य परिस्थिती एवढी नसली तरी किनारपट्टी भागातील
- सिद्धेश आचरेकर, मालवण
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर यंदाच्या वर्षी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दुष्काळजन्य परिस्थिती एवढी नसली तरी किनारपट्टी भागातील ग्रामस्थांच्यात मात्र कोरड पडायला लावणारी आहे. गतवर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळीत घट झाल्याने मार्चपासून पाणीटंचाईचे चटके सहन करायची नामुष्की किनारपट्टीवासीयांवर ओढवली आहे.
तळाशीलसह सर्जेकोट, देवबाग गावातील विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत आहे. गोड्या पाण्याच्या विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत असल्याने आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. मे महिन्यात खारट पाण्याची तीव्रता अधिक वाढणार असून यातून त्वचारोगासारखे आजार होण्याचीही शक्यता ग्रामस्थ वर्तवत आहेत. तालुक्यातील तळाशीलसह सजेर्कोट आणि देवबाग संगम या भागात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून येत्या आठ दिवसात तळाशील गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून न दिल्यास तळाशीलवासीय तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, तोंडवली-तळाशील येथील खारट पाणीप्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेत टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची होत असलेली हेळसांड थांबबावी यादृष्टीने प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही करण्यात येणे आवश्यक आहे. कारण सर्जेकोट येथील नागरिकांना दरदिवशी २00 प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच तळाशील येथील पर्यटन व्यावसायिकांनाही पाणी विकत घेण्याची नामुश्की ओढवली आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा सुमार पाऊस पडल्याने किनारपट्टी भागातील विहिरीत भूजल पातळी घटली आहे. त्यात पाण्याचाही वापर वाढल्याने पाण्याची सरासरी पातळी घटली. त्यामुळे समुद्रातील खारट पाण्याचे स्त्रोत गोड्या पाण्यात मिसळून पिण्याचे पाणी क्षारयुक्त बनले आहे. विहिरींच्या पाण्यात क्षारतेचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
तळाशील गावात दरवर्षी मे अखेरीस येथील विहिरीत क्षारयुक्त पाणी मिसळून खारट पाणी तयार होते.
गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने भूजल पातळी घटली. त्यामुळे गोड्या पाण्यात खारट पाणी मिसळायला सुरुवात झाली. दरवर्षी मे अखेरीस मिसळणारे हे पाणी यंदा मात्र फेब्रुवारीपासून सुरु झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिली आहे.
याप्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तळाशीलचे सर्व ग्रामस्थ तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढणार असल्याचा इशारा सरपंच संजय केळुसकर यांनी लोकमतला दिला आहे.