घारापुरी बेटावर पाणीटंचाई
By Admin | Published: May 19, 2016 02:57 AM2016-05-19T02:57:50+5:302016-05-19T02:57:50+5:30
सध्या महाराष्ट्रभर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याणे ठिकठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली
उरण : सध्या महाराष्ट्रभर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याणे ठिकठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील घारापुरी बेटावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, ती त्वरित सोडविण्यात यावी, अशी मागणी घारापुरीचे ग्रामपंचायत सदस्य बळीराम पद्माकर ठाकूर यांनी उरणचे नवनियुक्त नायब तहसीलदार योगिता कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
घारापुरी बेट हे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. घारापुरी बेटावर प्रामुख्याने राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर अशी तीन गावे असून, २००९-१० मध्ये तीनही गावांत शासनाच्या एका योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी, पाणी वितरण व धरण दुरुस्ती या कामी अंदाजे चार ते साडेचार करोड रुपये शासनाने खर्च केले आहेत. मात्र आजतागायत जलवाहिनीतून पाणी सोडण्यात आलेले नाही. वारंवार ग्रामस्थांनी मागणी करूनही पाइपलाइनद्वारे पाणी देण्यात आलेले नाही.
नळाची अनेक कनेक्शन्स ग्रामपंचायतीने बंद केली आहेत. मात्र आता धरणातील पाणी सोडणे बंद केल्याने घारापुरी ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून, येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी कुठून आणावे, हा प्रश्न पडला आहे. पाणीटंचाई त्वरित दूर व्हावी व जनतेला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी नायब तहसीलदार योगिता कोल्हे यांना एक निवेदन दिले. (वार्ताहर)
घारापुरी येथील प्रसिद्ध गुहेतील हौदाने केव्हाच तळ गाठला आहे. तसेच राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर विहिरींची नियमित स्वच्छता होत नसल्याने पाण्यास दुर्गंधी येत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी आरोग्यास घातक असल्याने नागरिकांना वापरता येत नाही. असे असताना ग्रामपंचायतीकडून आजपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अनेक वेळा तक्रार करूनही शासनानेही या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे घारापुरी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी सांगितले.