महुडे बुद्रुक येथे पाणीटंचाई
By admin | Published: March 3, 2017 01:11 AM2017-03-03T01:11:18+5:302017-03-03T01:11:18+5:30
महुडे बुद्रुक (ता. भोर) येथील भानुसदरा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित नसल्याने गावात पाणीटंचाई आहे
भोर : महुडे बुद्रुक (ता. भोर) येथील भानुसदरा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित नसल्याने गावात पाणीटंचाई आहे. गावाजवळच असलेल्या आखाडेवस्तीला जवळपास पाणीच उपलब्ध नसल्याने महिलांना एक किलोमीटरवरून डोक्यावरून पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल मोठ्या प्रमाणात होत असून टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.
भोर शहरापासून फक्त १० किमीवर असलेल्या महुडे बुद्रुक गावात बारा वाड्या-वस्त्या असून येथील सुमारे ४०० लोकसंख्या असलेले भानुसदरा तर गावापासून घेवडेश्वराच्या डोंगरावर १०० लोकवस्तीची आखाडेवस्ती ही धनगर समाजाचे लोक राहतात. पावसाळ्यात येथील नागरिक डोंगर उतारावरून वाहणारे झऱ्यांचे पाणी वापरतात. मात्र उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने गावातून विहिरीवरून २ किमीची पायपीट करून डोंगर चढून धनगर समाजाच्या महिलांना पाणी आणावे लागते. टँकरची मागणी करूनही वेळेवर टँकर सुरू होत नसल्याचे मारुती गोरे यांनी सांगितले.
महुडे बुद्रुक गावातील वाड्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना आंबेघर येथून राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी वापरलेले पाईप प्लॅस्टिकचे असल्याने वारंवार फुटतात. त्यामुळे गावात पाणीपुरवठा योजना असुनही ती सुरू नसल्याने दरवर्षी मार्च महिन्यापासून सुमारे साडेतीन महिने लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या महिलांना गावापासून अर्धा किमीवर असलेल्या विहिरीतून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हे पाणी पुढील पंधरा दिवसच पुरेल एवढेच आहे. पाणी गाळमिश्रीत असून त्यामुळे वाड्यांना टँकरशिवाय पर्याय नसल्याने टँकर सुरू करावा लागणार असल्याचे रामचंद्र दामगुडे दगडू दामगुडे, छाया दामगुडे, दगडू पिलाणे यांनी सांगितले. महुडे खुर्द गावाजवळ डोंगर उतारावर गोरेवस्ती व हुंबेवस्ती या २०० लोकवस्ती असलेल्या दोन धनगर समाजाच्या वस्त्यांनाही जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने टंचाई सुरू झाली आहे.
>वनव्यामुळे डोंगरावरील चाराही संपुष्टात
डोंगरांवरील गवत वणव्यात जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात पाणीटंचाईची झळ बसली आहे. महुडे खुर्दची गोरेवस्ती या धनगर समाजाच्या वस्तीवर पाणीटंचाई असल्याने विठ्ठल लक्ष्मण गोरे याने आपल्या २५ जनांवरांसह पिसावरे येथील डोंगरात स्थलांतर करून राहात होता. मात्र सोमवारी लागलेल्या वणव्यात विठ्ठल गोरे यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या एक हजार पेंढा, गवत आणि ५ ट्रॉली शेणखत जळाले. ऐन उन्हाळ्यात चारा जळाल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी गोरे यांनी केली आहे.