मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई
By admin | Published: March 3, 2017 02:43 AM2017-03-03T02:43:11+5:302017-03-03T02:43:11+5:30
खारघर सेक्टर १२मध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
पनवेल : खारघर सेक्टर १२मध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे त्रस्त रहिवाशांनी खारघर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश हटवार यांनी आठ दिवसांत पुरवठा पूर्ववत होईल, असे सांगितले.
खारघर शहरामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागते. मात्र, यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सिडकोच्या नियोजनाअभावी काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सिडकोने वेळीच उपाययोजना न केल्यास नागरिकांना आगामी काळात आणखी त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता सिडकोकडून पाणीकपात करण्यात येत असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे सेक्टर १२ अ आणि ब परिसरातील नागरिकांनी भाजपाच्या लीना गरड यांना नेतृत्वाखाली सिडकोकडे धाव घेत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्यावर अधिकारी हटवार यांनी आठ दिवसांची मुदत मागितली. तात्पुरता पाण्याचा वापर कमी करून सहकार्य करा, असे आवाहनही केले.
>कामोठे सेक्टर ९ येथील काही सोसायट्यांमध्ये दिवसभरात केवळ एकच तास पाणी येते. सध्या ही स्थिती आहे, तर भर उन्हाळ्यात काय अवस्था होईल, या चिंतेत नागरिक आहेत. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे.
>कामोठे, पनवेलमधील काही इमारतींमध्ये पाणीकपात करण्यात आली आहे. तालुका पोलीस ठाण्यालगत असलेल्या कैलास पार्क या सोसायटीत जवळपास ७० ते ८० कुटुंबांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी सकाळी एकदाच तासभरासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने रहिवासी हैराण आहेत.