सोलापूरला पाणीटंचाई : आषाढी यात्रेसाठी उजनीतून पाणी सोडणार
By admin | Published: July 5, 2016 08:51 PM2016-07-05T20:51:24+5:302016-07-05T20:51:24+5:30
पंढरपूरला आषाढी यात्रेनिमित्त होणारी वारकऱ्यांची गर्दी व सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमेत पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.
आषाढी यात्रेसाठी उजनीतून पाणी सोडणार
सोलापूरला पाणीटंचाई: महापालिका दीड कोटी पाणीपट्टी भरणार
सोलापूर : पंढरपूरला आषाढी यात्रेनिमित्त होणारी वारकऱ्यांची गर्दी व सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमेत पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.
मंत्रालयात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरच्या संभाव्य पाणी टंचाईबाबत बैठक घेतली. बैठकीला महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम उपस्थित होते. याचवेळी सोलापुरात जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी उजनीतून भीमेत पाणी सोडण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पालकमंत्र्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला पाटबंधारे विभागाचे अभियंता चौगुले, मनपा पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता राजकुमार रेड्डी उपस्थित होते. औज बंधाऱ्यात १२ दिवस पुरेल इतपत पाणीसाठा आहे. या काळात पाऊस न पडल्यास सोलापूरच्या पाणी पुरवठयाची स्थिती बिकट होणार आहे. संभाव्य पाणीटंचाई ओळखून उजनीतून भीमेत पाणी सोडणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेला दीड कोटी भरावे लागतील असा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने दिला. याबाबत पालकमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली. १५ जुलैनंतर होणारी पाणीटंचाई ओळखून महापालिका दोन दिवसात दीड कोटी भरेल असे आयुक्त काळम यांनी सांगितले.
आषाढी यात्रेसाठी पाटबंधारे खात्यातर्फे भीमेत पाणी सोडण्यात येणार आहे. याबरोबरच सोलापूरसाठी जादा पाणी सोडण्यात येईल. यातून औज व चिंचपूर बंधारा साडेचार मीटर क्षमतेने भरून दिला जाईल. यातून सोलापूरची पुढील दोन महिन्याची पाण्याची चिंता मिटेल. उजनी धरणात सध्या वजा ५३ पाणीसाठा आहे. पुण्यात पावसाने पाणीपातळीत एक टक्का वाढ झाली आहे. आषाढीसाठी पाणी सोडल्यास पुन्हा मूळ पातळीवर पाणी जाणार आहे. त्यामुळे पुणे व धरण परिसरात पावसाची नितांत गरज आहे.
दुबार पंपिंग सुरूच
उजनी जलवाहिनीतून दुबार पंपिंग करून सोलापूरला पाणी आणले जात आहे. यंदा पावसाला विलंब झाल्याने दुबार पंपिंगचे वेळापत्रक वाढले आहे. याचबरोबर पाणी पुरवठा विभागाने मागीलवेळेस सोडलेले पाणी काटकसरीने वापरले आहे. औज बंधाऱ्यात पाणी अडविल्यावर पाठीमागे १२ किलोमीटर पाणी थांबते. यातून कर्नाटकाचे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करतात. त्यामुळे यावेळेस चिंचपूर बंधारा रिकामा होईल तसे औज बंधाऱ्यातील पाणी वेगाने रिकामे करण्यात आल्याने जास्त दिवस पाणी पुरले आहे.